PM
महाराष्ट्र

२०२७ पर्यंत बेस्ट उपक्रमात संपूर्ण ताफ्यात इलेक्ट्रिक बसगाड्या-मंत्री उदय सामंत

नवशक्ती Web Desk

नागपूर : प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातील संपूर्ण बसताफा हा सन २०२७ पर्यंत इलेक्ट्रिकवर करण्याचे प्रस्तावित करण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

बेस्ट बससेवेसंदर्भात सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना सामंत बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की, ‘बेस्ट उपक्रमामार्फत सद्य:स्थितीत २१०० एकमजली व ९०० दुमजली इलेक्ट्रिक तसेच २०० एकमजली सीएनजी अशा एकूण ३२०० बसगाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ३५ दुमजली व ४५ एकमजली अशा एकूण ८० बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत.’

मुंबईतील वाढत्या वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्याकरिता बेस्ट उपक्रमामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दिनांक ९ जुलै, २०१९ पासून प्रवास भाड्‌याचे सुसूत्रीकरण करण्यात आले. सदर सुसूत्रीकरणादरम्यान वाढते प्रदूषण कमी करणे व खाजगी वाहनांचा वापर कमी करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या सर्वसाधारण बस सेवेवर पूर्वी आकारण्यात येत असलेले कमीत कमी प्रवासभाडे ८ वरुन ५ रुपये व वातानुकूलित बस सेवांकरिता आकारण्यात येत असलेले कमीत कमी प्रवासभाडे २० वरुन ६ रुपये करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत बेस्ट उपक्रमाचे मासिक उत्पन्न ६० कोटी रुपये असून मासिक खर्च २४० कोटी इतका आहे. १८० कोटी रुपये इतका मासिक तोट्याची रक्कम बेस्ट उपक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान स्वरुपात प्राप्त होत आहे.

पूर्वी बेस्ट उपक्रमामार्फत पुरविण्यात येत असलेल्या विद्युत पुरवठा दरपत्रकाची निश्चिती बेस्ट समितीमार्फत करण्यात येत होती, त्यावेळी बेस्ट परिवहन विभागाच्या तोट्याचे समायोजन विद्युत पुरवठा विभागाच्या अतिरिक्त महसुलातून करण्यात येत होती. परंतु विद्युत अधिनियम २००३अस्तित्वात आल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या विद्युत दराचे नियंत्रण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे गेल्यामुळे वीज दर ठरविण्याचे अधिकार बेस्ट उपक्रमाकडे राहिले नाहीत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचा महसुलावर मर्यादा आल्या. तसेच बेस्ट परिवहन विभागाच्या तोट्याचे समायोजन करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या एकूण संचित तोटयात वाढ होऊ लागली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसेसचा खर्च प्रति कि.मी. १९३.६४ रुपये इतका असून भाडेतत्वावरील बसेसचा खर्च प्रति कि.मी. १२० रुपये असा असल्यामुळे स्वमालकीपेक्षा भाड्याच्या गाड्यांची संख्या वाढविण्यावर बेस्ट उपक्रमामार्फत भर देण्यात आला असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त