महाराष्ट्र

पंतप्रधान आवास योजनेत पर्यावरणाचे उल्लंघन, केंद्र सरकारचे राज्य शासनाला चौकशी करण्याचे निर्देश

‘सिडको'ने पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या कथित पर्यावरण उल्लंघनाची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : ‘सिडको'ने पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या कथित पर्यावरण उल्लंघनाची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. वाढत्या समुद्र पातळीच्या जागतिक चिंतेकडे दुर्लक्ष करून खारफुटी आणि पनवेल खाडीजवळ पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इमारतींचे बांधकाम धोकादायकपणे होत असल्याची तक्रार पंतप्रधानांकडे पर्यावरण वॉचडॉग ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन‘ने केली होती.

खारघरमधील गृहनिर्माण प्रकल्पात सामावून घेतले जाणारे १० हजार नागरिक आणि अनेक छोटे व्यावसायिक भरतीच्या लाटेच्या हल्ल्यांच्या धोक्यात कायमचे राहतील, अशी चिंता‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ने पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.

अवकाळी पूर आणि विशेषतः किनारपट्टीवरील मान्सूनचा कहर यापासून कोणतेही धडे न घेता ‘सिडको'ने प्रसारमाध्यमांसमोर एकट्या खारघर येथे १७ टॉवर उभारले जातील, असे सांगितले आहे. परंतु, ते आपत्तीला निमंत्रण असल्यामुळे कुमार यांनी त्यांची तक्रार पंतप्रधान कार्याय पब्लिक ग्रीव्हन्सेस (पीएमओपीजी) वेबसाइटवर केली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आता ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथोरिटी'ला सदर समस्येचा अभ्यास करून अहवाल देण्यास सांगितले आहे. सीआरझेड विभागातील शास्त्रज्ञ डॉ. राघवन पी. यांनी २३ ऑगस्ट रोजीच्या पत्राद्वारे निदर्शनास आणले की, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ अंतर्गत किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या तरतुदींची अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. म्हणून त्यांनी ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथोरिटी'च्या सदस्य सचिवांना नवी मुंबईतील पंतप्रधान आवास योजनाच्या अंमलबजावणीमध्ये गंभीर उल्लंघन किती प्रमाणात आहे, ते तपासण्यास सांगितले.

विशेषतः खारघर रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील पंतप्रधान आवास योजना गृहनिर्माण प्रकल्पाची कंपाऊंड भिंत जवळपास खारफुटीला स्पर्श करते. समुद्रातील वनस्पती आणि प्रकल्पातील अंतर ८ मीटर ते २५ मीटर आहे, असे पर्यावरणवाद्यांनी गुगल अर्थ नकाशांचा हवाला देऊन म्हटले आहे. तसेच प्रकल्पांसाठी दिलेल्या केंद्र आणि राज्य दोन्ही मंजुरीचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, ४ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथोरिटी'च्या बैठकीत स्पष्टपणे नमूद करण्यात आल्यानुसार प्रकल्प अंशतः सीआरझेड-१ अंतर्गत असल्याने ‘सिडको'ला ५० मीटर खारफुटीच्या बफर झोनमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास आणि १०० मीटर सीआरझेडचा धक्का कायम ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान कोणत्याही खारफुटीवर परिणाम होणार नाही आणि ५० मीटरची बफर लाइन राखली जावी, असे अगोदरच नमूद करण्यात आले आहे. खारफुटीच्या क्षेत्राकडे धूळ उत्सर्जन, आदी कमी करण्यासाठी बफर लाइनच्या बाजूने पर्णसंभार असलेली उंच झाडांची दाट झाडे असावीत.

- बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेक्ट फाऊंडेशन.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी