मुंबई : राज्यातील शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना बीएलओ व इतर निवडणूक विषयक कामातून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि एकूणच शालेय गुणवत्तेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिक्षणमंत्र्यांनी ही ठाम भूमिका घेतली आहे.
शिक्षण हक्क अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) नुसार शिक्षकांचे मुख्य कर्तव्य हे 'अध्यापन' हेच आहे. मात्र, अलिकडच्या काळात शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर बीएलओ आणि इतर अशैक्षणिक कामांवर जुंपण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग बुडतात आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येता, असल्याचे पत्रात म्हंटले आहे.
तसेच शिक्षकांऐवजी ही कामे कोणाला देता येतील, याचा पर्यायही भुसे यांनी सुचवला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचा संदर्भ देत त्यांनी म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोस्टमन, आरोग्य कर्मचारी, आशा ताई, आणि पालिका कर्मचारी अशा विविध विभागातील मनुष्यबळाचा वापर बीएलओ कामांसाठी करता येऊ शकतो. राज्यात हे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने शिक्षकांचा वापर तिथे करणे टाळावे, असे त्यांनी नमुद केले आहे.