महाराष्ट्र

गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करा, शिशिर शिंदेंची  मागणी

Swapnil S

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळेल आणि आपला मुलगा नगरसेवक, आमदार नव्हे तर थेट खासदार होईल हे गजानन कीर्तिकर यांचे विधान पक्ष विरोधी असून त्यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी आमदार आणि शिंदे गटाचे उपनेते  शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलेल्या गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे सांगत महायुतीच्या पराभवाचे संकेत दिले. कीर्तिकर यांच्या विधानाने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.  

 निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नीने  पक्षविरोधी वक्तव्य करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली आहे. त्यामुळे 'मातोश्रीचे लाचार श्री' होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी शिशिर शिंदे यांनी पत्रात  केली आहे.

गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने  उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच, गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वत:च्या प्रचारासाठी आणि विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्यांचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र, फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने  मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली . गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
 
दरम्यान, शिशिर शिंदे यांच्या मागणीचा अमोल कीर्तिकर यांनी समाचार घेतला आहे. गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी कोण करतोय? शिशिर शिंदे कोण असे म्हणायची वेळ आली आहे,  अशी टीका अमोल किर्तीकर यांनी केली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त