मुंबई : विधिमंडळाच्या लॉबीत गुरुवारी झालेल्या राड्यामुळे कोणा एका व्यक्तीची नव्हे तर इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहेत. त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांनाच नावे ठेवली जात आहेत. हे सगळे आमदार माजले आहेत, असे म्हटले जात असल्याच्या कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिल्या. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून आपण राज्यातील जनतेला काय सांगणार आहोत, अशा घटनांचे समर्थन करणे योग्य होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्माननीय सदस्यांना राज्यातील जनतेच्या मनात या घटनेबाबत काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत, याची जाणीव करून दिली. ही विधानसभा आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या मालकीची नाही. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या मालकीची ही विधानसभा आहे. समाजाला दिशा देणारे काम झाले पाहिजे. पण विचारातून, चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे. आपण दोघांना सांगितले व त्यांनी खेद व्यक्त केला. शब्दातून निघणारे विष हे नागाच्या विषापेक्षा अधिक विषारी असते, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
आपण माणसे आहोत, राग अनावर होतो. कुणी अध्यक्षांसमोर अध्यक्ष मॅनेज असल्याचे बोलत आहे. नियमाने याठिकाणी ४५ लक्षवेधी होण्याची गरज आहे. २०० लक्षवेधी घेत आहोत. अशावेळी जी भाषा आपण वापरतो, ती योग्य नाही. तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकायची, हे समिती ठरवेल. पण आपण त्रिसूत्री ठरवावी लागेल. संसदीय परंपरा, भाषेचे पालन व सातत्याने संवाद ठेवावा लागेल, याचे भान त्यांनी सदस्यांना करुन दिले.
गुरुवारी जी हाणामारी झाली, कोणासोबत कोण येतंय. याबाबत शिस्त असली पाहिजे. सर्जेराव टकलेवर सहा गुन्हे आहेत. नितीन देशमुखवर ८ गुन्हे आहेत. अशी मंडळी येऊन मारामारी करतात, हे योग्य नाही. अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. काहींनी चूक केली म्हणून सर्वांना शिक्षा नको. योग्य सुरक्षा व्यवस्था उभारा. कुठलाही अभ्यागत येऊ द्या. बिल्ल्याशिवाय तो दिसता कामा नये. एखाद्याने येऊन दहशतवादी कृत्य केल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? आमदार बिल्ला लावून येतात. पण अभ्यागतांच्या गळ्यात किमान एक ओळखपत्र असावे. नाहीतर सुरक्षारक्षकांनी त्यास बाहेर काढावे. ज्या लोकांनी संधी मिळाली नाही म्हणून एजंट म्हटले, हस्तक म्हटले त्यांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
सर्व लोकलचे डबे एसी करणार!
मुंब्रा येथील रेल्वे अपघातांच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई उपनगरीय लोकलचे सर्व डबे एसी करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री याबाबत सकारात्मक आहेत. विशेष म्हणजे एसीचे डबे लोकलला जोडण्यात येणार असले तरी तिकीट दर प्रवाशांना परवडणारे असतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
इस्लामपूर नव्हे ‘ईश्वरपूर’ - भुजबळ
इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे इस्लामपूर शहराचे नाव आता ‘ईश्वरपूर’ करण्यात येईल, अशी घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्य सरकारच्या शिफारशीनुसार हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.