मुंबई : नगर परिषद व नगर पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. हा विजय भाजपच्या टीमचा असून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी नेत्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजपचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानतो. या निवडणुकीत ज्या पद्धतीने विजय मिळवून दिला, या विजयाची घौडदौड महानगरपालिकेच्या निवडणुकीत कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
राज्यातील २८८ नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्र्यांनी रामगिरी बंगल्यावर नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांची भेट घेतली.
महाराष्ट्रात भाजप नंबर एक
नागपुरातील मतदारांचे धन्यवाद की त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली की, महाराष्ट्रात भाजप हाच एक नंबरचा पक्ष आहे. महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले आणि मविआचे केवळ ५० च्या जवळपास नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे मविआचा सफाया झाला आहे.