नाशिक : ‘मी प्रभू श्रीरामांना वंदन करतोय. पण काल-परवा दोन भाऊ येऊन गेले. नाशिकमध्ये आले, पण रामाची आठवणच झाली नाही. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मानला नाही, आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही. जो राम का नहीं, वह किसी काम का नहीं', अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर प्रहार केला.
नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी प्रचारसभा पार पडली. ते म्हणाले की, ‘अलीकडच्या काळात काही लोक म्हणायला लागले की, देव खरंच आहेत की नाही? असा प्रश्न अनेकांना पडायला लागला. देवाची खिल्ली काही लोक उडवायला लागले. पण जाऊद्या त्यांच्याबद्दल मी फार बोलणार नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की, नाशिक शहरात जो काही विकास होणार आहे त्याची क्षमता केवळ भाजपमध्ये आहे’, असा दावा फडणवीस यांनी केला.
माझी खिल्ली उडवली गेली. म्हणाले, नाशिक दत्तक घेतलं होतं त्याचं काय झालं? खऱ्या अर्थाने हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं की, नाशिक दत्तक घेतोय. त्यानंतर मी तक्रार केली नाही. मी नाशिक दत्तक घेतलं २०१७ मध्ये त्यानंतर २०१९ मध्ये मी विरोधी पक्षनेता झालो. मला दोनच वर्ष मिळाली. मी त्याची तक्रार केली नाही. कारण आम्ही तक्रार करणारे लोकं नाहीत", असे ते म्हणाले.
‘कोरोना काळात उबाठा, मनसे, काँग्रेसचे नेते घरी बसले होते त्यावेळी देवाभाऊ आला होता, या ठिकाणच्या प्रत्येक कोविड सेंटर आणि आयसीयूमध्ये जाणारा देवाभाऊ होता. मला तुम्हाला विचारायचं आहे की, तुम्ही कितीवेळा नाशिकला आले? मी वर्षातून चारवेळा नाशिकला येतो. तुम्ही कितीवेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की, नाशिकला विसरायचं, अशा पद्धतीचं निवडणूक पर्यटन आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पर्यटन करणारी ही लोकं आहेत’, असा टोला फडणवीसांनी लगावला.
काळजी करु नका. आजही नाशिकसोबत माझं नातं तेच आहे. या नाशिकची जबाबदारी आम्ही घेतली आहे. नाशिककरांनी तुम्हालाही सत्ता दिली होती. त्यावेळी तुम्ही काहीच केलं नाही. ज्यावेळेला कुंभमेळ्याची वेळ आली तेव्हा हात वर केला. आमच्याकडे कमी वेळ होता. पण आम्ही २०१५ च्या वेळी सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने दिला. कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला. हा कुंभमेळा एकमेव कुंभमेळा आहे, ज्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. हे लोकं कुंभमेळ्याची खिल्ली उडवणारे लोकं आहेत. गंगेचं पाणी पिणार नाही असं बोलतात आणि गोदा तीरी येऊन भाषणं करतात, अशा पद्धतीचं काम करणारे हे लोकं आहेत", अशी टीका फडणवीसांनी केली.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘साधुग्राम’ उभारण्यासाठी वृक्षतोडीवरून झालेल्या वादाचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, ‘प्रस्तावित साधुग्राम १९९३ पासून आरक्षित भूखंडावर आहे. २००३ आणि २०१५ मध्ये त्याच्या विकासाचे टप्पे राबवले गेले. २००२ मध्ये एनएमसीने सुमारे ७ कोटी रुपये खर्चून ५४ एकर भूखंड संपादन करण्याचा ठराव मंजूर केला होता; मात्र प्रत्यक्ष संपादन पूर्ण झाले नाही.” मनसेच्या कार्यकाळात १६ एप्रिल २०१६ रोजी ठराव मंजूर करून त्या जमिनीचा सर्कस, क्रीडांगणे, उत्सव, पार्किंग आणि उत्पन्नासाठी नर्सिंग कॉलेजसारख्या उपक्रमांसाठी वापर करता येईल, असे नमूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिकला स्मार्ट शहर बनवणार
नाशिकला स्मार्ट शहर बनवणार आहोत. शहरात चेहरा ओळख, बॅग डिटेक्शन आणि नंबर प्लेट ओळख अशा सुविधांसह सुमारे ४ हजार एआय-सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच एनएमसीची स्वतःची फायबर-ऑप्टिक नेटवर्क व्यवस्था उभारली जाईल. नाशिकमध्ये आयटी पार्क आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी हब उभारले जातील. या भागातील गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.