महाराष्ट्र

पूर नियंत्रणासाठी पूररेषेबाबत सर्वेक्षण करा; मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा निश्चित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील अनेक नद्यांच्या किनारी भागात पूरस्थिती निर्माण झाल्याची नोंद नाही. यामुळे विकास कामात मर्यादा येत असून पूर नियंत्रणासाठी पूर रेषेबाबत सर्वेक्षण करत मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Swapnil S

मुंबई : राज्यातील अनेक नद्यांच्या किनारी भागात पूरस्थिती निर्माण झाल्याची नोंद नाही. यामुळे विकास कामात मर्यादा येत असून पूर नियंत्रणासाठी पूर रेषेबाबत सर्वेक्षण करत मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली. स्थानिक आमदार किसन कथोरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.गोविंदराज, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उल्हास नदीकिनारी नकाशातील पूर रेषा आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबत माहिती घेतली. यानंतर जेथे अनेक वर्षे पूर आलेला नाही त्याठिकाणी जलसंपदा विभागाने पूर रेषेबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले. कुळगाव बदलापूर हद्दीतील बेलवली कात्रप रेल्वे क्रॉसिंग ओव्हर ब्रिजबाबत ‘एमएमआरडीए’ने तर दत्त चौक ते समर्थनगर पर्यंतच्या रेल्वे लाईनला समांतर ओव्हर ब्रिज बांधण्याच्या कामाबाबत नगर परिषदेने तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी. या कामाबरोबरच बदलापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सॅटिस प्रकल्पाच्या कामास गती द्यावी. गॅरेज रोड ते होपलाईन पॉवर हाऊस बदलापूर पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास गती द्यावी. कांजूरमार्ग- ऐरोली- शिळफाटा- कटाई- बदलापूर मेट्रो या सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा आढावा घेऊन सुरू असलेली प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

काळू धरणाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. बदलापूर शहरात स्वतंत्र वीज उपकेंद्र असणे आवश्यक असल्याने प्रस्तावित टाटा पॉवर कंपनीच्या उपकेंद्रास लागणाऱ्या जागेला एमएमआरडीएने तातडीने मान्यता द्यावी, असे सांगून कुळगाव पोलीस स्टेशनसाठी ‘एमआयडीसी’च्या जागेबाबत तातडीने प्रस्ताव सादर करून गृह विभागाने त्यास मंजूरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कुळगाव मधील खासगी मिळकतीवरील शाळेच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरक्षणात बदल करून ती शाळा नगरपरिषदेने चालवण्यास घ्यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Thane : पाणी बिल थकबाकीसाठी पालिकेची मोहीम तीव्र; १५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली

अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण; दिल्लीतील मेट्रो स्थानकाचे नामांतर, आता 'श्री राम मंदिर मयूर विहार' अशी नवी ओळख

Mumbai : बुरखा घालून लेडीज डब्यात शिरला पुरुष; जाब विचारताच धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन, RPF कडून गुन्हा दाखल

समृद्धी महामार्गावरील नागपूर ते दक्षिण मुंबई प्रवास होणार सुलभ; ठाण्यातून थेट कोस्टल रोडला जोडणार नवीन मार्ग

Mumbai : बेलासिस पुलाचे सुरक्षा प्रमाणपत्र जारी; पश्चिम रेल्वेची माहिती