महिनाभरात चौदा 'बाबां'चा उठला बाजार; 'खरात' प्रकरणानंतर भोंदूंचा बुरखा फाटला; लैंगिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रकार उघड 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

महिनाभरात चौदा 'बाबां'चा उठला बाजार; 'खरात' प्रकरणानंतर भोंदूंचा बुरखा फाटला; लैंगिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रकार उघड

नाशिकमध्ये घडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मात्र, या घटनेमुळे पीडितांना आवाज उठवण्याची हिंमत मिळाली असून, मागील ३० दिवसांत अंनिसच्या प्रयत्नांतून १४ भोंदूबाबांवर कारवाई करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नाशिकमध्ये घडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मात्र, या एका घटनेने राज्याच्या कानाकोपऱ्यातील पीडित महिला आणि पुरुषांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची मोठी हिंमत दिली आहे. याचेच फलित म्हणून, मागील अवघ्या ३० दिवसांत म्हणजेच महिनाभरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) प्रयत्नांतून राज्यभरात तब्बल १४ भोंदूबाबांचे बाजार उठले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १८ वर्षांच्या अथक संघर्षानंतर २०१३ मध्ये 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३' हा कायदा राज्यात अस्तित्वात आला. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असले, तरी, आजही ग्रामीण भागांपासून ते शहरी भागांपर्यंत भोंदूगिरीचे पेव फुटले असल्याचे या ताज्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. या भोंदूबाबांनी महिलांचे लैंगिक शोषण करण्यासोबतच लोकांची मोठी आर्थिक लूट केल्याचे समोर आले आहे.

पीडितांनी न घाबरता पुढे यावे...

खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा वाटू लागली आहे. काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे तर काही ठिकाणी अंनिसच्या मदतीने गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी पीडितांनी न घाबरता पुढे यावे, अंनिस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे.

महिनाभरात गजाआड झालेले 'भोंदू' :

  • अशोक कुमार खरात - नाशिक

  • गडगेबाबा (राजेंद्र गडगे) संगमनेर, अहिल्यानगर

  • चेतन सुनील माळी - मूर्तिजापूर, अकोला

  • पंकज देवराम घोलप - येडगांव, पुणे

  • मनोहर मामा भोसले - कुरुडवाडी, सोलापूर

  • नाना बर्डे आळे फाटा, पुणे -

  • ऋषिकेश वैद्य वसई, मुंबई

  • अल्ताफ रईस खान - मालाड, मुंबई

  • रिधम पांचाळ मालाड, मुंबई

  • गणेश शिंदे श्रीरामपूर, अहिल्यानगर

  • अर्जुन चव्हाण (टनटन बाबा) - नवी मुंबई

  • विठोबा वाल्मीक जाट - सातपूर, नाशिक

  • किसन तळपे मंदोशी - खेड

  • महेशगिरी (महेश काकडे) निफाड, नाशिक.

शांत राहणे म्हणजे गुन्हेगारांना प्रोत्साहन...

भय आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने अनेक पीडित आजही समोर येण्यास घाबरत आहेत. मात्र, अशा प्रकरणांमध्ये आता शांत राहणे म्हणजे गुन्हेगारांना प्रोत्साहन देणे आहे, असे मत अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह अॅड. रंजना गवांदे आणि सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी पीडितांना न घाबरता पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार