छत्रपती संभाजीनगर : हॉटेल ॲम्बेसिडरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून राहत असलेल्या तोतया आयएएस अधिकाऱ्याची थाटमाटात राहणीमान, आर्थिक उलाढाली आणि विदेशी नागरिकासोबतचे व्यवहार यांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्पना भागवत असे नाव असलेल्या या महिलेने तिच्या अफगाणिस्तानातील मित्र अशरफ खिल याच्यासोबत लाखोंचा आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, तिच्याकडून मिळालेल्या पैशांपैकी काही रक्कम अशरफने हवालामार्फत पाकिस्तानातील त्याचा भाऊ अबिद यामा, आई आणि बहिणीला पाठवल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या व्यवहारामागे हेरगिरीची शक्यता पोलीस तपासत आहेत.
कल्पना आणि अशरफ यांच्यातील संबंध केवळ मैत्रीवर आधारित होते की त्यामागे कोणते गूढ नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध विविध तपास यंत्रणा घेत आहेत. कल्पनाच्या म्हणण्यानुसार, मैत्री झाल्यानंतर अशरफ अनेकदा शहरात येत असल्याचेही तिने कबूल केले आहे. या व्यवहारातील नातेसंबंध, पैशांची हालचाल आणि त्याची उद्दिष्टे तपास यंत्रणांच्या केंद्रबिंदूवर आहेत. त्यामुळे अशरफ खिल आता तपास संस्थांच्या रडारवर आला आहे.
दरम्यान, आयबी, एटीएस, सीआयडी आणि एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारीही कल्पना भागवतची चौकशी केली. तिच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपत असून तिला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिच्या खात्यात तब्बल ३२ लाख रुपये जमा झाल्याचे सिद्ध झाले आहे. तिने शहरातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांकडेही पैसे मागितल्याचे समोर आले असून संबंधित नेत्यांनी तिचा नंबर ब्लॉक केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. वेगवेगळी कारणे सांगत ती पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होती, असेही विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
कल्पना मानसिक रोगी
धक्कादायक म्हणजे, तिला मानसिक आजार असल्याची माहितीही उघड झाली आहे. सध्या तिची आई त्याच हॉटेलमध्ये असून मुलगा तिचा ताबा घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाने संभाजीनगरमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून हवाला, विदेशी संपर्क, खोटी ओळख आणि संशयास्पद व्यवहार यांची एकत्रित गुंफण उकलण्यासाठी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचा तपास वेगाने सुरू आहे.
खोटी कागदपत्रे आणि संशयास्पद हालचाली
हॉटेल ॲम्बेसिडरमध्ये एक महिला तिच्या आईसह दीर्घ काळ राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल येरमे आणि स्वाती केदार यांनी तिची चौकशी केली. त्या वेळी तिच्याकडे खोडखाड केलेले आधारकार्ड आणि २०१७ च्या आयएएस निकालाची प्रत आढळली. ती सतत गोलमोल आणि उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने विशेष शाखेचे हवालदार सतीश बोर्डे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.