महाराष्ट्रासह चार राज्यांत पसरलेले बनावट औषधांचे रॅकेट उघड; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 
महाराष्ट्र

महाराष्ट्रासह चार राज्यांत पसरलेले बनावट औषधांचे रॅकेट उघड; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पसरलेले बनावट औषधांचे एक मोठे रॅकेट उघडकीला आणले आहे. यामध्ये बनावट अॅलोपॅथिक औषधे आणि भेसळयुक्त आयुर्वेदिक उत्पादनांचा समावेश आहे.

Swapnil S

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पसरलेले बनावट औषधांचे एक मोठे रॅकेट उघडकीला आणले आहे. यामध्ये बनावट अॅलोपॅथिक औषधे आणि भेसळयुक्त आयुर्वेदिक उत्पादनांचा समावेश आहे.

नागपुरात एका प्रकरणात 'कायमोरल फोर्ट' या लोकप्रिय दाहशामक औषधाच्या बनावट आवृत्त्यांची विक्री होत असल्याचे समोर आले. औषध दुकाने आणि घाऊक विक्रेत्यांकडून नमुने गोळा करून ते मुंबईतील राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. या तपासणीत औषधांमधील एन्झाईमची पातळी निर्धारित मानकांपेक्षा खूपच कमी असल्याचे आढळले. मूळ उत्पादक कंपनीनेही हे जप्त केलेले आपल्या कंपनीने बनवलेले नाही, असे स्पष्ट केल्यानंतर ते बनावट असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी १२ व्यक्ती उत्पादन व संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

आयुर्वेदिक कॅप्सूलमध्ये 'टाडालाफिल'चे मिश्रण

दुसऱ्या प्रकरणात कामराज कॅप्सूल या आयुर्वेदिक उत्पादनाची एफडीएने तपासणी केली. यात कॅप्सूलमध्ये पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी वापरले जाणारे प्रिस्क्रिप्शन औषध टाडालाफिल आणि पॅरासिटामोलचे घटक असल्याचे आढळले.

एफडीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४०' आणि 'भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३' अंतर्गत या प्रकरणांमध्ये पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हृदयविकार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी धोकादायक

आरोग्य तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की, 'टाडालाफिल'चे अनपेक्षित सेवन हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. या कॅप्सूलच्या निर्मिती आणि पुरवठ्याचे जाळे नागपूर, पंजाब आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेले होते. या प्रकरणीही संबंधित कंपन्या आणि व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल केले.

'बनावट, भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांची विक्री थेट सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. एफडीए बनावट औषधांच्या विरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवत असून, सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.'
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार

भिवंडीत फेमस शोरमा हॉटेलवर बुलडोझर; अन्न विषबाधाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ वर; महापालिकेने केली कारवाई

मंच्युरियनमध्ये आढळले पालीचे पिल्लू; उल्हासनगरातील तरुणीची प्रकृती बिघडली

लाडकी बहीणनंतर शिवसेनेचे लाडकी सून अभियान; राज्य प्रमुखपदी मीनाक्षी शिंदे, महिलांच्या न्यायासाठी उभारणार सक्षम यंत्रणा

Mumbai : उच्च रक्तदाब ठरतोय आरोग्याचा मोठा धोका; फादर्स डे निमित्ताने डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता