FICCI FRAMES 2025 : "सर, तुम्ही संत्री कशी खातात?"अक्षय कुमारचा फडणवीसांना मजेशीर सवाल; मुख्यमंत्र्यांनी दिलं 'ओजी नागपूरकर' उत्तर 
महाराष्ट्र

FICCI FRAMES 2025 : "सर, तुम्ही संत्री कशी खातात?"अक्षय कुमारचा फडणवीसांना मजेशीर सवाल; मुख्यमंत्र्यांनी दिलं 'ओजी नागपूरकर' उत्तर

भारतातील सर्वात मोठी मीडिया आणि मनोरंजन परिषद ‘फिक्की फ्रेम्स’च्या २५व्या सत्राची सोमवारी मुंबईत रंगतदार सुरुवात झाली. उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या हलक्याफुलक्या, विनोदी आणि उद्योगाशी निगडित चर्चेने वातावरण रंगून गेले.

Krantee V. Kale

मुंबई : भारतातील सर्वात मोठी मीडिया आणि मनोरंजन परिषद ‘फिक्की फ्रेम्स’च्या २५व्या सत्राची सोमवारी मुंबईत रंगतदार सुरुवात झाली. उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या हलक्याफुलक्या, विनोदी आणि उद्योगाशी निगडित चर्चेने वातावरण रंगून गेले. फेअरमाउंट हॉटेल येथे आयोजित या उच्चस्तरीय परिषदेच्या माध्यमातून सिनेमा, मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एकाच मंचावर आले आहेत.

"सर, ऑरेंजेस कसे खाता?" - अक्षयचा मजेशीर सवाल

संवादाची सुरुवात करताना अक्षय कुमारने आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्या प्रसिद्ध मुलाखतीची आठवण करून दिली, ज्यात त्याने मोदींना विचारले होते — “आप आम कैसे खाते हो?” हा प्रश्न सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरून अक्षय प्रचंड ट्रोल देखील झाला होता. त्याच अंदाजात अक्षयने मुख्यमंत्री फडणवीसांना हसत विचारलं - “सर, आप ऑरेंजेस कैसे खाते हो?”. नागपूरच्या ‘ऑरेंज सिटी’ या ओळखीचा संदर्भ देत हा सवाल उपस्थितांमध्ये हशा पिकवणारा ठरला.

फडणवीसांची ‘ओजी नागपूरकर’ स्टाइल

मुख्यमंत्र्यांनी हसत उत्तर दिलं आणि नागपूरकरांची संत्रं खाण्याची खास पद्धत उलगडून सांगितली. “संत्रं सोलायचं नाही. ते अर्धं कापायचं, थोडं मीठ शिंपडायचं आणि मग आंब्यासारखं खायचं,” असं सांगत त्यांनी सांगितलं की या ‘ओजी नागपूरकर’ स्टाइलमुळे संत्र्याचा स्वाद अधिक ताजा आणि तिखट-गोड लागतो. हे ऐकून अक्षय खुदुखुदू हसला आणि स्वतः ती पद्धत वापरून पाहणार असल्याचं सांगितलं. या संवादानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात हशा पिकवला.

"नायकसारखं काम करा"

चित्रपटाच्या संदर्भाने बोलताना फडणवीस म्हणाले, “लोक मला अनेकदा सांगतात — ‘नायकसारखं काम करा, बघा एका दिवसात किती बदल घडवला!’ पण त्या चित्रपटाने फारच उंच मापदंड तयार केला आहे,” असं ते म्हणाले.

गोरगाव फिल्मसिटीबाबत मोठी घोषणा

यानंतर चर्चा महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीच्या विकासावर केंद्रित झाली. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील गोरगाव फिल्मसिटीला जागतिक स्तरावरील फिल्म डेस्टिनेशन बनवण्याचा सरकारचा संकल्प आहे. “पूर्वी यासाठी आराखडा तयार झाला होता पण अंमलबजावणी झाली नाही. आमचं सरकार आता अत्याधुनिक स्टुडिओ आणि उत्पादन सुविधा उभारून एक सशक्त फिल्म इकोसिस्टम उभारणार आहे,” असं ते म्हणाले. हा प्रकल्प पुढील वर्षभरात सुरू होईल आणि चार वर्षांत पूर्ण होईल, अशी घोषणा त्यांनी केली.

फिक्की फ्रेम्स २०२५ मध्ये दिग्गजांचा मेळा

या वर्षीच्या परिषदेतील सहभागींची यादीही तितकीच प्रभावी आहे. स्मृती इराणी, अनिल कपूर, आयुष्मान खुराना, नीना गुप्ता, हुमा कुरेशी, प्रतीक गांधी, कोंकणा सेन शर्मा, दिव्या दत्ता आणि राजपाल यादव यांसारख्या नामांकित कलाकारांनी विविध चर्चासत्रांमध्ये आणि फायरसाइड चॅट्स मध्ये सहभाग घेतला आहे. रशिया हा २०२५ साठीचा भागीदार देश म्हणून सहभागी झाला असून, मॉस्किनो आणि मॉस्को एक्स्पोर्ट सेंटरच्या प्रतिनिधीमंडळाच्या माध्यमातून चित्रपट निर्मिती, कंटेंट एक्स्चेंज आणि सांस्कृतिक भागीदारीसाठी सहकार्य वाढवण्यात येणार आहे.

'या वर्षी आनंदाचा शिधा नाही’; आर्थिक अडचणींचा हवाला देत महाराष्ट्र सरकारचा निर्णय

CJI अवमान प्रकरण : शरद पवार गटाचे संविधान सन्मान आंदोलन; रोहित पवार म्हणाले, ''मनुवादी प्रवृत्ती...

Thane : मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर, तर ३१ डिसेंबरपर्यंत मेट्रो ४ सुरू करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

ठाणेकरांवर पाणीकपातीचे संकट; तीन दिवस १० टक्के पाणीकपात; नागरिकांना काटकसरीने वापराचे आवाहन

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा; प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे MMRDA ला निर्देश