महाराष्ट्र

१०५ हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला ! फिल्मफेअर मुंबईहून गुजरातला गेला, आव्हाडांनी कलाकारांचा समाचार घेतला

....तर तुम्हा हुतात्म्यांना नक्कीच वाटत असेल की, आम्ही कशाला छातीवर गोळ्या झेलल्या ? माफ करा आम्हाला !

Swapnil S

भारतातील प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक, ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2024) यंदा २७, २८ जानेवारी रोजी मुंबईऐवजी गुजरातमध्ये होणार आहे. पारंपारिकपणे मुंबईत आयोजित केला जाणारा हा पुरस्कार सोहळा गुजरातला नेल्यावरून 'आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले, आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला. मुंबईला कमजोर करण्याचा हा अजून एक पुरावा आहे', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कलाकारांना धारेवर धरले आहे.

मराठी मातीचा उपयोग या लोकांनी (कलाकारांनी) फक्त स्वतःचे खिसे भरण्यापुरताच केला, कोणालाच या शहराबद्दल प्रेम- आपुलकी नाही अशा शब्दांत समाचार घेत मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांनो आम्हाला माफ करा, अशी लांबलचक पोस्ट आव्हाड यांनी केली आहे.

वाचा जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट जशीच्या तशी -

भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते जवळ-जवळ १०० वर्ष जुने आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, अनेक चित्रपट, अनेक गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या गाडीवर काम करणारा अक्षय कुमार याला या मातीचा स्पर्श होताच तो अब्जाधीश झाला. किती नावे घ्यावीत; घेऊ तेव्हढी कमीच आहेत. या मराठी मातीच्या परिसस्पर्शामुळे चित्रपटसृष्टीची भरभराट होत गेली. निदान या कलाकारांनी तरी या मातीची ओळख ठेवायला हवी होती. फिल्मफेअर अॅवाॅर्ड मुंबईतून हलवला जात आहे. त्याविरोधात एकही कलावंत ब्र उच्चारण्यास तयार नाही. म्हणजेच, मराठी मातीचा उपयोग फक्त या लोकांनी स्वतःचे खिसे भरण्यापुरतेच केला. एकेकाची घरे शंभर - दीडशे कोटींची आहेत. त्यांनी हे पैसे मेहनतीने कमावले; पण, या मातीतूनच कमावले, हे देखील महत्वाचे आहे. थोडी तरी या शहराबद्दल प्रेम- आपुलकी असती तर एखादा कलाकार तरी बोलला असता. पण, कोणी बोलेल, असे दिसत नाही. १०५ हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला ! तुम्ही अतिशय मेहनतीने मुंबई महाराष्ट्राला दिली. या मुंबईने देशाला पोसले. या मुंबईने आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली; जगात एक स्वतःची ओळख निर्माण केली. त्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम जर झालं असेल आणि आम्ही मराठी माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा का असेना तो जर शांत बसत असेल तर तुम्हा हुतात्म्यांना नक्कीच वाटत असेल की, आम्ही कशाला छातीवर गोळ्या झेलल्या ? माफ करा आम्हाला !

दरम्यान, फिल्मफेअर पुरस्कार दरवर्षी मुंबईमध्ये आयोजित केला जात होता. केवळ २०२० मध्ये हा सोहळा गुवाहाटी येथे झाला होता. यंदा २८ जानेवारी २०२४ रोजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये फिल्मफेअर २०२४ चा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक करण जोहर करणार असून, आयुष्यमान खुराना आणि मनीष पॉल हे सह-सूत्रसंचालक आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले