बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात बुधवारी पहाटे एका बसची एसयूव्हीशी धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार, तर १२ जण जखमी झाले. एसटी बस आणि बोलेरो या गाडीची खामगाव-शेगाव महामार्गावर पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास टक्कर झाली. या अपघातात एसयूव्हीमधील चार जण ठार झाले. ते सर्व जण कोल्हापूरला जात होते.
या घटनेनंतर, अपघातग्रस्त एसटी बस रस्त्यावर उभी असताना एका खासगी बसने तिला धडक दिली, ज्यामध्ये त्या बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.