महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत पंढरीकडे निघालेली वारकऱ्यांची बस दरीत, ५ वारकऱ्यांचा मृत्यू

एक्स्प्रेस वेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही या मार्गावर ट्रॅक्टरला प्रवास करण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Swapnil S

उद्याच्या आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतानाच वारकऱ्यांच्या एका बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. डोंबिवलीहून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसला रात्री १ च्या सुमारास ट्रॅक्टरने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील भाविकांचा एक गट ट्रॅव्हल्स बसने पंढरपूरला जात होता. बसमध्ये ५४ भाविक होते. रात्री उशीरा १ वाजण्याच्या सुमारास, बस मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून पंढरपूरकडे जात होती. त्यावेळी बसच्या पुढे एक ट्रॅक्टर होता. पण, अचानक बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टरला धडकल्याने बस ३० ते ४० फूट खोल दरीत पडली. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याचे सांगितले जात आहे.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य केले आणि जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात आणि पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, एक्स्प्रेस वेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही या मार्गावर ट्रॅक्टरला प्रवास करण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत