मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 'आम्ही हे करू' या नावाने जाहीरनाम्याच्या पुस्तिकेचे अनावरण केले तर 'आम्ही हे केले' या पुस्तिकेतून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला आहे.
राज ठाकरे यांनी जाहीरनाम्यात मूलभूत गरजांपासून मराठी अस्मितेचे मुद्दे मांडले आहेत. मनसेचा जाहीरनामा चार भागांमध्ये असून त्यापैकी पहिल्या भागामध्ये मूलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसे अन्न, पिण्याचे पाणी, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रीडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार यांचा उल्लेख आहे.
जाहीरनाम्याच्या दुसऱ्या भागामध्ये दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन, राज्यातील शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनि:सारण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविविधता यांचा समावेश आहे, तर तिसऱ्या भागामध्ये औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण यांचा समावेश आहे.
जाहीरनाम्याच्या चौथ्या भागात मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरामध्ये मराठीचा वापर, व्यवहारामध्ये मराठी, डिजिटल जगात मराठी, जागतिक व्यासपीठावर मराठी, गड-किल्ल्यांचे संवर्धन, पारंपरिक खेळ यांचा समावेश आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारसभांमुळे आपली प्रकृती नाजूक झाली असल्याची माहिती राज ठाकरेंनीच शुक्रवारी दिली आणि त्यांनी भिवंडीतील भाषण अवघ्या दोन मिनिटांतच भाषण संपवले व तेथून ते निघाले आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेले. राज ठाकरे आज भिवंडी विधानसभा मतदारसंघात होते. तिथे जनतेला संबोधित करताना त्यांचा आवाज बारीक झाला होता. ते म्हणाले, मी सगळीकडे बोलून आलो. काय बोलायचे ते सांगितले. पण हे ऐकायला कोणी तयार नसतात. माझी थोडीशी प्रकृती नाजूक आहे. थोडे बरे वाटत नाहीय. म्हणून मी तुमचे दर्शन घेण्याकरता आलो. प्रत्यक्षात भेटलो. पण २० तारखेला गाफिल राहू नका. आपले मित्र परिवार नातेवाईक या सर्वांना येत्या २० तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करायचे आवाहन करा.
मनसेची शिवाजी पार्कवरील सभा रद्द - राज ठाकरे
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) १७ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र सभेसाठी अद्यापही परवानगी मिळालेली नाही. सभा आयोजित करण्यासाठी केवळ दीड दिवसांचा कालावधी राहिला असून त्या मुदतीत सभेचे आयोजन करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी होणारी सभा रद्द करीत असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्यामुळे आता सभेऐवजी मुंबई, ठाण्यातील मतदारसंघात दौरा सुरू केला जाणार आहे, असे ठाकरे म्हणाले. शिवाजी महाराज पार्क मैदानात प्रचार सभा घेण्याच्या परवानगीकरिता मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे) या तिन्ही पक्षांनी अर्ज केले आहेत. निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता संपणार असून १७ नोव्हेंबर रोजी शेवटची प्रचार सभा राजकीय पक्षांना घेता येणार आहे.