मुंबई : शिक्षण संचालनालयाने राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ११ मे पासून अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे, तर १५ मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार असून २६ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार, ८ ते १० मे या कालावधीत विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग १ ऑनलाइन सादर करता येईल. ११ ते १३ मे या कालावधीत व्यवस्थापन, इन- हाऊस, अल्पसंख्याक कोट्यासाठी झिरो राउंड राबविण्यात येणार आहे. १५ मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. यावर १६ तारखेला या यादीवर हरकती सादर करता येतील.
व्यवस्थापन, इन- हाऊस, अल्पसंख्याक कोट्यासाठी झिरो राउंडचे वाटप करण्यात येणार आहे. २० मे रोजी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार असून त्या कोटा जागांसह पहिल्या फेरीकरिता प्रदर्शित करण्यात येतील. २६ मे रोजी पहिली फेरी जाहीर करण्यात येईल. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना २६ ते २८ मे या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. २९ मी रोजी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार असून ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. अकरावी प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्याची सुविधा १० एप्रिल पासून सुरु करण्यात आली होती. त्यानुसार १० एप्रिल ते ८ मे पर्यंत ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थांनी प्रवेश अर्जाचा भाग १ भरून नोंदणी केली आहे. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ओपन तू ऑल चौथी फेरी, मुलींकरिता विशेष पाचवी फेरी राबविण्यात येणार आहे.