अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर; ७१ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर; ७१ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. या यादीत ७१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये यामध्ये २९ हजार ५६९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना १६ जूनला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी एकूण १ लाख ४६ हजार ८२७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले होते. त्यापैकी ७१ हजार ८९ विद्यार्थ्यांना विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये २९ हजार ५६९ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून १२ हजार ७४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि ८ हजार ६०३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या लॉगिनमध्ये जाऊन कॅप ऑलॉटमेंट स्टेटस या पर्यायाद्वारे त्यांना कोणते कनिष्ठ - महाविद्यालय मिळाले आहे, याची खात्री करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अशी आहे प्रवेश प्रक्रिया

विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी अपलोड डॉक्युमेंट या पर्यायाद्वारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रोसिड फॉर अॅडमिशन या पर्यायावर सहमती नोंदवावी. त्यानंतर विहित कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे तसेच दुसऱ्या ते दहाव्या पसंतीपर्यंतचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश हवा असल्यास नियोजित कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

शाखा आणि प्रवेश देण्यात आलेले विद्यार्थी संख्या

  • कला शाखा - ७४८४

  • वाणिज्य शाखा - ३९१८७

  • विज्ञान शाखा - २४४१८

एकापेक्षा अधिक पर्याय

इन-हाऊस, अल्पसंख्यांक आणि केंद्रीय कोटा या तिन्ही माध्यमांतून अर्ज केलेल्या काही विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. अशा परिस्थितीत कोणत्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा, याचा अंतिम निर्णय विद्यार्थी आणि पालकांनी घ्यायचा आहे, असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी केले आहे.

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मध्यरात्रीचा ब्लॉक; हार्बर मार्गावर रविवारी दिवसाचा मेगाब्लॉक

Mumbai : एअर इंडिया इमारतीला मिळणार नवी झळाळी; नूतनीकरणासाठी १८१ कोटी मंजूर

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींत वाढ; 'विनोदाच्या नादात विकृती केल्यास थेट कारवाई', गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा

Mumbai : ब्रेक, स्टेअरिंग नीट हाताळा! दुचाकीस्वारांना क्रॉस करू नका! सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे 'बेस्ट काऊन्सलिंग'