नागपूर : आज जे देश जगात दादागिरी करत आहेत, ते आर्थिक सक्षम व त्यांच्याकडे उच्च तंत्रज्ञान आहे. भारताला आयातीपेक्षा निर्यात वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) येथे बोलताना गडकरी यांनी भारताची निर्यात वाढवणे आणि आयात कमी करण्याची गरजही अधोरेखित केली. ते म्हणाले की, आपली निर्यात आणि अर्थव्यवस्थेचा दर वाढल्यास आपल्याला कुणाकडे जाण्याची गरज भासणार नाही. जे ‘दादागिरी’ करत आहेत ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. आपण उत्तम तंत्रज्ञान आणि साधने मिळवली, तर आपण कुणावर दादागिरी करणार नाही, कारण आपली संस्कृती आपल्याला शिकवते की जगाचे कल्याण हेच सर्वात महत्त्वाचे आहे," असे त्यांनी म्हटले.
जगभर अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत आणि त्या सर्व समस्यांचे उत्तर म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान. म्हणजेच ज्ञान, जे एक शक्ती आहे. भारताला ‘विश्वगुरू’ व्हायचे असल्यास निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे गरजेचे आहे.
देशाच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन संस्था, आयआयटी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. इतर क्षेत्रातील संशोधनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.