गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्याची तयारी सुरू झाली आहे; पण यंदा गावी पोहोचण्याआधीच चाकरमान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. रेल्वे आणि एसटीच्या अनेक गाड्यांचं आरक्षण फुल्ल झाल्याने ऐनवेळी खासगी बसचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना भरमसाट भाडं मोजावं लागत असल्याचं चित्र आहे. एरवी सुमारे १ हजार रुपयांच्या आसपास मिळणारं खासगी बसचं तिकीट काही मार्गांवर खासगी बसच्या तिकिटांचे दर थेट ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबई महानगर प्रदेशातून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग वाढली आहे. दरवर्षी या काळात लाखो नागरिक कोकणात जातात. त्यामुळे रेल्वे, एसटी आणि खासगी बससेवांवर मोठा ताण येतो. यंदाही रेल्वे आणि एसटीची तिकिटं मिळवण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असतानाच खासगी बसच्या वाढलेल्या दरांमुळे नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वेचं तिकीट नाही, खासगी बससाठी हजारोंचा भुर्दंड
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने रेल्वे आणि एसटीच्या तिकिटांना मोठी मागणी आहे. अनेक गाड्यांचं आरक्षण फुल्ल झाल्याने किंवा वेटिंग लिस्ट वाढल्याने प्रवासी खासगी बसकडे वळत आहेत. मात्र, याच गर्दीचा परिणाम खासगी बसच्या भाड्यांवरही दिसत आहे.
सामान्य दिवसांत मुंबईहून कोकणातील अनेक ठिकाणी खासगी बसने जाण्यासाठी साधारण १ हजार रुपयांच्या आसपास भाडं आकारलं जातं. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात काही खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रति प्रवासी ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याचं सांगितलं जात आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी मार्गांवर १२ सप्टेंबरच्या आसपास काही बसचे दर ३ हजार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.
गर्दीच्या हंगामादरम्यान एसटीच्या तिकिटाच्या दीडपट भाडेवाढ करण्याची परवानगी खासगी ट्रॅव्हल्सना दिली जाते. मात्र, काही ऑपरेटरकडून त्यापेक्षा अधिक दर आकारले जात असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. त्यामुळे कुटुंबासह कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
रेल्वेच्या विशेष गाड्यांनाही मोठी मागणी
गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने कोकणाच्या दिशेने विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मात्र, अनेक गाड्यांचं आरक्षण सुरू झाल्यानंतर अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर बुकिंग झालं. त्यामुळे कन्फर्म तिकीट न मिळालेल्या अनेक प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे.
एसटीच्या ५,२०० हून अधिक विशेष गाड्या
रेल्वेचं तिकीट न मिळालेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळानेही मोठी तयारी केली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी ५,२०० हून अधिक विशेष गाड्या चालवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी समूह आरक्षणालाही प्राधान्य दिलं जात असून, काही ठिकाणी राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांकडूनही कोकणात जाण्यासाठी बसची व्यवस्था केली जात आहे.
गणपतीच्या आनंदाआधी खिशाला फटका
रेल्वे आणि एसटीमध्ये जागा न मिळाल्यास खासगी बस हा महत्त्वाचा पर्याय उरतो. मात्र, ऐन गणेशोत्सवात वाढलेल्या दरांमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तिकीट बुक करताना उपलब्ध रेल्वे-एसटी पर्याय तपासणं आणि खासगी बसचे दर आधीच पडताळून पाहणं प्रवाशांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.