गणपतीपुळ्याला निघालेल्या मित्रांचा प्रवास ठरला अखेरचा! कराडजवळ कार २-३ वेळा पलटी होऊन भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी 
महाराष्ट्र

गणपतीपुळ्याला निघालेल्या मित्रांचा प्रवास ठरला अखेरचा! कराडजवळ कार २-३ वेळा पलटी होऊन भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

गणपतीपुळे येथे फिरायला निघालेल्या तीन मित्रांच्या प्रवासावर काळाने घाला घातला. कराडजवळ त्यांच्या भरधाव कारचा भीषण अपघात होऊन कार दोन ते तीन वेळा उलटली. या दुर्घटनेत एक तरुण जागीच ठार झाला असून दोन मित्र जखमी झाले आहेत.

Mayuri Gawade

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गणपतीपुळे येथे फिरायला निघालेल्या तीन मित्रांवर काळाने घाला घातला. कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ त्यांच्या भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आणि दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही मित्र सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत होते. सुट्टी मिळाल्याने त्यांनी कोकणातील गणपतीपुळे येथे जाण्याचा बेत आखला होता. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ त्यांची कार अपघातग्रस्त झाली.

नियंत्रण सुटल्याने कार अनेकदा पलटी

भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यावर दोन ते तीन वेळा पलटी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर कार रस्त्यालगतच्या झाडीत जाऊन अडकली. अपघाताचा जोर इतका होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले.

बीडच्या तरुणाचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातात ओंकार खंडागळे (वय २३) याचा जागीच मृत्यू झाला. ओंकार हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून नोकरीच्या निमित्ताने पाटण येथे राहत होता. तर प्रशिक धावणे (वय २८), मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी, हा गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसरा मित्र सातारा जिल्ह्यातील पडळ गावचा रहिवासी असून तो या अपघातातून किरकोळ जखमी अवस्थेत बचावला.

ग्रामस्थांची मदतीसाठी धाव

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कार झाडीत अडकली असल्याने स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नांनी जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले.

घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून या दुर्घटनेमुळे मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी