पुणे : आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आणि ‘गीतरामायण’सारख्या अजरामर साहित्याची साक्ष असलेली पुण्यातील शिवाजीनगर भागातील ‘पंचवटी’ ही वास्तू सध्या कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर आणि त्यांच्या मातोश्री शीतल माडगूळकर यांच्यात या वास्तूच्या मालकी हक्कावरून आणि अस्तित्वावरून उफाळून आलेल्या वादामुळे सांस्कृतिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया आणि पत्रकाच्या माध्यमातून एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे हा कौटुंबिक वाद आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे.
गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर पोस्ट लिहीत नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, गदिमांची ही पवित्र वास्तू पाडून ती बिल्डरला विकण्यासाठी घरातील काही मंडळींकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला जात आहे. जे लोक बाहेरून गदिमांचा वारसा सांगत मोठी पुस्तके लिहितात, तेच पडद्यामागे ही वास्तू नष्ट करण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात सुमित्र यांनी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सुरुवातीला हा कौटुंबिक वाद असल्याने तो आपापसात सोडवण्याचा सल्ला दिला होता, मात्र नातेवाईकांचा त्रास आणि धमक्यांचे सत्र वाढल्याने सुमित्र यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली आहे. सुमित्र यांची पत्नी आणि दहावीत शिकणारी मुलगी यांनीही या वास्तूबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले असून गदिमांचा हा वारसा जपण्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार आहेत.
५० टक्के वाटा देण्याची नातवाची मागणी
आमचा वाद व्यक्तीशी नसून तत्त्वाशी आहे, थोड्या पैशांसाठी हा सांस्कृतिक वारसा नष्ट करू नये, असे आवाहन सुमित्र माडगुळकर यांनी गदिमा प्रेमींना केले आहे. मुलाच्या वागणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांची आई शीतल यांनी पत्रकाद्वारे सर्व दावे फेटाळले. जेव्हा ही मालमत्ता त्यांच्या नावावर होणार नाही हे स्पष्ट झाले तेव्हा त्यांनी ५० टक्के वाट्याची मागणी करत वाद घालण्यास सुरुवात केली, असे त्या म्हणाल्या.
वास्तूचे जतन व्हावे!
पुण्यातील ही ‘पंचवटी’ वास्तू १९५३ साली गदिमांनी विकत घेतली होती. या वास्तूमध्ये अनेक वर्षे गदिमांचे वास्तव्य होते आणि याच ठिकाणी बसून त्यांनी ‘गीत रामायण’ तसेच अनेक श्रेष्ठ साहित्याची आणि गीतांची निर्मिती केली. पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांसारख्या दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने आणि सहवासाने ही वास्तू सदैव भारावलेली असायची. गदिमांच्या हयातीत ते नेहमी म्हणायचे की, जोपर्यंत ही ‘पंचवटी’ उभी आहे, तोपर्यंत माझे अस्तित्व आहे. गदिमांनी अत्यंत गरिबीतून आणि कष्टाने उभारलेली ही वास्तू पुढच्या पिढीसाठी जतन व्हावी, अशी सुमित्र यांची इच्छा आहे.
हा आमचा कौटुंबिक प्रश्न
सुमित्र माडगूळकर यांनी पोस्टद्वारे आपले काका आणि गदिमांचे पुत्र, ज्येष्ठ लेखक आनंद माडगूळकर यांच्यावरही नाव न घेता आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. हा प्रश्न कौटुंबिक मर्यादेतच चर्चा करून सोडवला जाईल. त्याला कृपया कोणीही भडक रंग देऊ नका, त्याच्यात राजकारण आणू नये,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.