पुणे : पुण्याची २१ वर्षीय जलतरणपटू गीता मालुसरे ही भारताची जलपरी म्हणून ओळखली जाते. जेलीफिशच्या विषारी हल्ल्यामुळे हात निकामी होण्याच्या मार्गावर असताना आणि तब्बल ११ शस्त्रक्रियांच्या असह्य वेदनांवर मात करत तिने अवघ्या १४ तास ३१ मिनिटांत ५४ किलोमीटर लांबीची 'इंग्लिश खाडी' पोहून पार करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.
अवघ्या तिसऱ्या वर्षी जलतरणाला सुरुवात केलेल्या गीताने लहानपणापासूनच आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. २०१७ मध्ये वयाच्या केवळ १३व्या वर्षी मुंबईच्या समुद्रात ३२ किलोमीटरचे अंतर सहा तास २६ मिनिटांत पूर्ण करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र तिच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. कोरोना महामारीमुळे २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत तिच्या सरावात मोठा खंड पडला. नोव्हेंबर २०२२ मध्ये रत्नागिरी येथे सागरी स्पर्धेदरम्यान जेलीफिशच्या विषारी दंशामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.