मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढायचे की स्वतंत्र लढायचे याबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल तेथे ठीक आहे, पण जर महायुतीत निवडणूक युती झाली नाही तर पाडापाडीसाठी आम्ही एकमेकांसमोर उभे राहणार, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सदानंद शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाजन यांनी हा थेट इशारा दिल्याने महायुतीत घमासान सुरू होण्याची लक्षणे आहेत.
पुढील दोन ते तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप महायुतीतील पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की, स्वतंत्रपणे लढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र, ज्या ठिकाणी शक्य नसेल अशा काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीतील नेते सांगत आहेत.
मात्र, अलीकडे महायुतीतून उलटसुलट वक्तव्ये केली जात असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी पाडापाडीची भाषा केल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नाही याचे संकेत मिळत आहेत.
‘महायुती मिळून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण काही ठिकाणी जमले नाही, तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आम्ही करु. मात्र, युती झाली नाही तर आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडेच उभे राहणार आहोत. मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी आम्ही एकमेकांना पाडणारच आहोत, असेही महाजन म्हणाले. जळगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.