मुंबई : सरकारी अधिकारी सोशल मीडिया वापरताना शिस्त पाळतील याची खात्री करण्यासाठी राज्य सरकार लवकरच शासन निर्णय जारी करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराच्या वर्तणुकीचे "नियमन" करण्यासाठी योग्य नियम तयार केले जातील. अधिकारी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असावेत. मात्र त्यांनी वैयक्तिक प्रसिद्धीमागे लागू नये, असे फडणवीस म्हणाले.
काही सरकारी अधिकारी आपले कर्तव्य ग्लोरिफाय करताना दिसतात, जे योग्य नाही. त्यांनी शिस्तबद्ध वर्तन ठेवावे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे असावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी स्पष्ट नियम असण्याच्या गरजेवर भर दिला आणि जम्मू-कश्मीर, गुजरात तसेच मसुरीतील लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने जारी केलेल्या सोशल मीडिया वापरावरील मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ दिला.
काही अधिकारी सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करतात, तसेच काहीजण सरकारविरोधी गटांमध्येही सहभागी होतात, ही बाब त्यांनी चिंता व्यक्त करत सांगितली. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (आचरण) नियम, १९७९ यांचा आढावा घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.