छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा, असे मत माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राज्य सरकार आरक्षण कसे देणार, असा प्रश्न विरोधी पक्षांनीही सरकारला विचारावा, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले असून संभाजी छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होती, तेथे निर्णय होऊ शकतो, जरांगे यांच्या मागणीबाबत हो की नाही ते सांगावे, असेही संभाजी छत्रपती म्हणाले. शाहू महाराजांनी पूर्वी दिलेल्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश होता. सरकारला जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी नसेल तर ते सत्तेत असून उपयोग काय, असेही ते म्हणाले.
जरांगे यांचे वैद्यकीय अहवाल अत्यंत वाईट आहेत, त्यांच्या प्रकृतीचे बरेवाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्र यावे आणि ते आरक्षण देऊ शकतात की नाही ते स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागलेल्या असताना त्यांना जरांगे, मराठा अथवा बहुजन नकोसे झाले आहेत, मात्र हे प्रकार सहन केले जाणार नाहीत.
विरोधी पक्षांनी केवळ जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन उपयोग नाही, आवाजही उठविला पाहिजे, आरक्षणाच्या मागणीवर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी जरांगे यांनी केली असेल तर अधिवेशन बोलाविले पाहिजे, असेही ते म्हणाले.