महाराष्ट्र

कॉ. पानसरे हत्याप्रकरणी सहा आरोपींना जामीन; वीरेंद्र तावडेच्या अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेणार

ज्येष्ठ विचारवंत, लेखक कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सातपैकी सहा आरोपींना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, लेखक कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सातपैकी सहा आरोपींना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांच्या न्यायालयाने सहा आरोपींना मोठा दिलासा दिला. आरोपी अनेक वर्षे तुरुंगात असून हत्या प्रकरणात विशेष प्रगतीही दिसून आलेली नाही, असा ठपका ठेवून न्यायालयाने सहा आरोपींना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. तसेच आणखी एक आरोपी वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्र सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.

कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा चार दिवसांनी २० फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही खळबळ उडाली होती. हत्या प्रकरणातील सहभागाच्या आरोपाखाली सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बद्दी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींना २०१८-२०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. या सहाही आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकांवर न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांच्या एकलपीठाने सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय बुधवारी जाहीर केला.

सरकारी पक्षाने आरोपींच्या जामीन अर्जावर तीव्र विरोध केला होता. तथापि, हत्या प्रकरणाचा ठोस तपास करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. तपासात कुठलीही ठोस प्रगती दिसून येत नसताना आरोपींना दीर्घकाळ तुरुंगात डांबू शकत नाही, असे मत नोंदवत न्यायमूर्ती किलोर यांनी सहा आरोपींची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच आणखी एक आरोपी वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.

हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामार्फत सुरू होता. नंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी), महाराष्ट्र यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तपास वर्ग करण्यात आला होता.

गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ

'बदला' घेण्यासाठी महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर

इंजिनिअर ते करणी सेनेची महिला प्रमुख, रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातची नवी मंत्री, अवघ्या तीन वर्षात मिळवलं यश

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन