मुंबई : महायुती सरकारच्या काळात गुंडांचा हैदोस सुरू असून सरकारकडून या गुंडांचे उदात्तीकरण होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेदरम्यान केला. उत्तर प्रदेश राज्यात पोलीस भरती परीक्षेचा पेपर फुटल्यावर परीक्षा रद्द केली गेली, मात्र आपल्याकडे परीक्षेसाठी गँग काम करते. परीक्षार्थी हुशार व प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचेही दानवे म्हणाले.
गेल्या वेळी अतिवृष्टी झाल्यावर सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र अद्याप ते अनुदानही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. रुग्णवाहिका टेंडर प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. सरकारने १ रुपयांत पीकविम्याची घोषणा केली, मात्र यात कंपन्यांचे भले झाले. सरकार पीक विम्या कंपन्यांचे एजंट आहेत,” असा आरोप दानवे यांनी केला.
शासन आपल्या दारी न जाता जनतेलाच शासनाच्या दारोदारी चकरा माराव्या लागत असल्याची टीका दानवे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावर केली. “सरकारने महानंद डेअरी गुजरातच्या हवाली केली. आरे डेअरी, रेसकोर्स आदी प्रश्नांवर या अंतरिम अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचे दानवे म्हणाले. राज्यात गुंडाराज सुरू असून काही गुंडांना त्यांच्या पश्चात सत्ताधारी आमदार हिंदू डॉन उपमा देतात. गुंड राजरोसपणे वर्षा बंगल्यावर मंत्रालयात जातात. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली असून सरकारचे आयात-निर्यात धोरण हे शेतकरी विरोधी आहे. सरकारने कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. शेतकऱ्यांच्या धोरणात व्यापारीच लयलूट करत आहेत, असेही अंबादास दानवे म्हणाले.