कराड : पाय घसरून धरणाच्या कालव्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी बापाने कालव्यात उडी मारली; मात्र, वडिलांनाही पोहता येत नव्हते. हे बघून वडिलांच्या वडिलांनीही उडी मारली. पाण्याच्या प्रवाहामुळे ते देखील वाहत जाऊ लागले. तेव्हा सुनेने सासऱ्यांच्या दिशेने साडी टाकली व साडीच्या साहाय्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढून वाचवले. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. वडील बेपत्ता आहेत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात अजनुज (ता. खंडाळा) येथे रविवारी ही हृदयद्रावक घटना घडली.
शंभूराज विक्रम पवार (वय ५ वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव असून, त्याचे वडील विक्रम मधुकर पवार (वय ३२) यांचा अद्यापही शोध सुरू आहे. पाय घसरून धोम-बलकवडी धरणाच्या कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी बापाने कालव्यात उडी मारली; मात्र, दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
अजनुज (ता. खंडाळा) येथील मधुकर पवार, त्यांचा मुलगा विक्रम, सून आणि नातू शंभूराज हे धोम-बलकवडी कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी ५ वर्षीय शंभुराज हा पाय घसरून कालव्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील विक्रम यांनी पाण्यात उडी घेतली; मात्र, त्यांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे बाप-लेक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. हे बघून विक्रम यांचे वडील मधुकर पवार यांनीदेखील पाण्यात उडी घेतली; मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहत जाऊ लागले. या थरारक प्रसंगी मधुकर पवार यांच्या सुनेने सासऱ्यांच्या दिशेने साडी टाकली व साडीच्या साहाय्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढून वाचवले; मात्र, पती विक्रम आणि मुलगा शंभुराज हे वाहून गेले.
शिरवळ येथील रेस्क्यू टीम आणि शिरवळ पोलिसांनी विक्रम मधुकर पवार यांचा सायंकाळी उशीरापर्यंत शोध घेतला; मात्र, ते सापडले नाहीत. अखेर अंधारामुळं शोध मोहीम थांबविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, पोलीस निरिक्षक सुनिल शेळके, नायब तहसिलदार योगेश चंदनशिवे, मंडलाधिकारी संतोष नाबर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे; मात्र या घटनेने खंडाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.