महाराष्ट्र

हर्षवर्धन पाटलांना आता साखरझोप! राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची संस्था आहे. या माध्यमातून साखर उद्योगाला मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई : राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हातात घेतले होते. त्यावेळी ‘भाजपमध्ये आल्यावर मला शांत झोप लागते,’ असे विधान त्यांनी केले होते. परंतु गेल्या पाच वर्षांत त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यामुळे आता राज्यसभेची उमेदवारी निश्चित मिळेल, अशी आशा होती. तसेच त्यांचे नावही पुढे आले होते. परंतु देव पाण्यात घालून बसलेल्या अनेकांना हुलकावणी मिळाली आणि काँग्रेसमधूनच आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा अपेक्षाभंग झाला. मात्र, लगेचच भाजपने त्यांचे पुनर्वसन करीत राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. त्यामुळे पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अखेर पुनर्वसन झाले असून त्यांना आता ‘साखर’झोप लागणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ मध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीच्या दत्तामामा भरणे यांनी पराभूत केले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लागला होता. तेव्हापासून त्यांना पक्षांतर्गत पदावरच समाधान मानावे लागले. दरम्यानच्या काळात विधान परिषद, राज्यसभा निवडणूक झाली. परंतु हर्षवर्धन पाटील यांचा विचार केला गेला नाही. दरम्यान, अलीकडच्या काळात राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली होती. कारण त्यांचे कट्टर विरोधक आमदार दत्तामामा भरणे हेही अजित पवार गटासोबत महायुतीत सामील झाल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

दरम्यान, राज्यात राज्यसभेच्या ६ जागा रिक्त झाल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव पुढे आले होते. त्यातच आगामी काळात लोकसभा निवडणूक असल्याने त्यांचा विचार होणे अपेक्षित होते. कारण इंदापूर हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. अशा स्थितीत या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची साथही तितकीच महत्त्वाची आहे. याचा विचार करून त्यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु ऐनवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्याने राज्यसभेसाठी त्यांचे नाव निश्चित केले गेले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे नाव मागे पडले. मात्र, अशा स्थितीत त्यांची नाराजी ओढवून न घेता हर्षवर्धन पाटील यांच्यावर थेट राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले गेले. हर्षवर्धन पाटील यांना थेट राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी मिळाल्याने ते पुन्हा सक्रिय होऊ शकतात.

कारखानदारीला बळ मिळणार

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची संस्था आहे. या माध्यमातून साखर उद्योगाला मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते. तसेच साखर उद्योगातील अडचणी सोडविण्याचे काम केले जाते. अशा राष्ट्रीय पातळीवरील संस्थेवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागल्याने या माध्यमातून साखर उद्योगावर आपली पकड निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पद मानले जात आहे.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल