मुंबई : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करूनही १ कोटी ४० लाखांची थकीत बिलाची रक्कम मिळत नसल्याने अखेर हर्षल पाटील (३५) या तरुण कंत्राटदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांची कामे पूर्ण करून देयकाची ८९ हजार कोटींची रक्कम देण्यास महायुती सरकार टाळाटाळ करत आहेत. आज हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आपले जीवन संपवले असून बिलाची थकीत रक्कम न मिळाल्यास राज्यातील तीन लाखांहून अधिक कंत्राटदार आपले जीवन संपवतील, असा इशारा दिल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले.
अनेक खात्यांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बालविकास खात्यात वितरीत करण्यात आल्याने मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता सरकारने बिल वेळेत न दिल्याने एका तरुण कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलले आहे. जलजीवन विकासकामाचे बिल वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली. जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ ही योजना सध्या ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात घराघरापर्यंत पाणी पोहचवण्यात यावे, हा सरकारचा हेतू आहे. त्याचेच एक कंत्राट हर्षल पाटील यांना मिळाले होते. परंतु केलेल्या कामाचे १ कोटी ४० लाखांचे बिल मिळत नसल्याने हर्षल यांनी आत्महत्या केली. शासनाने तातडीने हर्षल पाटील यांच्या कुटुंबास आर्थिक मदत आणि प्रलंबित असलेली देयके द्यावीत. अन्यथा नवयुवक, उद्योजक, कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील. याची शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भोसले यांनी दिला.
प्रकरणाची चौकशी होणार - अजित पवार
कोणाची बिल थकीत त्यांची यादी द्या, सगळ्यांचे बिल देण्याची प्रक्रिया सुरू असून याविषयी एक बैठकही झाली आहे. एका कंत्राटदाराने सब कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. त्या कंत्राटदाराने सब कंत्राटदाराला पैसे दिले नाहीत. मी कंत्राटदाराची माहिती घेत असून सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
हर्षलला कंत्राट दिलेच नाही - गुलाबराव पाटील
हर्षल पाटील याला जिल्हा परिषदेने कोणतेही कंत्राट दिले नाही, त्याच्या नावावर कुठलेही बिल नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.