महाराष्ट्र

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात उंदरांचा उच्छाद; विद्यार्थ्याला चावा घेतल्याचा प्रकार उघडकीस

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Swapnil S

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वसतिगृह परिसरात उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला उंदराने चावा घेतल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित ही गंभीर समस्या लक्षात घेता, विद्यापीठ प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी यावर ठोस उपाययोजना झालेली नाही. उंदरांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत असून, स्वच्छतेच्या अभावामुळे डास आणि इतर कीटकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर या पार्श्वभूमीवर, वसतिगृहामध्ये त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी, उंदरांचे निर्मूलन करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशी समस्या उद्भवू नये म्हणून नियमित स्वच्छता आणि निगराणी ठेवावी, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशा महत्त्वाच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू यांना केलेल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक असून, येथे शिक्षण, संशोधन आणि नवकल्पनांसाठी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. मात्र, अशा प्रकारच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन आणि अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे.

- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा