पुणे : एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर टीका करायचे पण सहकुटुंब एकत्र जेवायचे मात्र, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं आहे असं मत भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी व्यक्त केलं.
मोरया प्रकाशनातर्फे मेधा किरीट यांनी लिहिलेल्या 'अटलजी व्रतस्थ याज्ञिक' या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते आज पुणे पुस्तक महोत्सवात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, मोरया प्रकाशनाचे कौस्तुभदेव यावेळी उपस्थित होते.
पुणे येथील भव्य पुस्तक महोत्सवात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय संस्कृतीवर आणि पक्षनिष्ठेवर भाष्य केले. यावेळी तावडे यांनी सध्याच्या राजकारणातील संवाद आणि सौहार्द कमी होत असल्याबद्दल स्पष्ट खंत व्यक्त केली. पूर्वीच्या काळात राजकीय नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध अत्यंत 'हेल्दी' असायचे, जे आता दुर्मिळ झाले आहेत असे ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचे दाखले देताना तावडे म्हणाले की, एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर जाहीर सभांमधून प्रखर टीका करायचे, परंतु ते सहकुटुंब एकत्र जेवायला देखील बसायचे.
स्वतःच्या अनुभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते, तेव्हा सभागृहात ते मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करायचे. मात्र, मधल्या सुट्टीत मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या केबिनमध्ये जाऊन डबा शेअर करायचे आणि पुन्हा सभागृहात येऊन तितक्याच जोमाने चर्चा करायचे. आजच्या काळात मात्र सकाळी ९ वाजता भोंगा वाजला की त्याला उत्तर देण्यातच वेळ जातो आणि अशा प्रकारचा खेळीमेळीचा सुसंवाद आता राहिलेला नाही.
स्वतःच्या आयुष्यातील राजकीय चढउतारांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून समाजकारण करण्यासाठी आहे, ही स्पष्टता असेल तर तिकीट न मिळणे या गोष्टी गौण ठरतात.
अटलजींच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकताना तावडे यांनी सांगितले की, अटलजी जितके महान नेते होते, तितकेच ते प्रतिभावंत साहित्यिक आणि कवी सुद्धा होते. त्यांना मराठी नाटकांची विशेष आवड होती आणि मुंबईत आल्यावर ते शिवाजी मंदिरमध्ये आवर्जून नाटक पाहायला जायचे. कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी दाखवलेली जिद्द आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी त्यांनी आखलेला 'सुवर्ण चतुष्कोन' प्रकल्प हा नव्या पिढीसाठी अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्याच प्रेरणेतून आजच्या अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षाच्या विस्ताराबद्दल बोलताना तावडे यांनी प्रज्ञा सातव, अशोक चव्हाण आणि विखे पाटील यांसारख्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले. जर एखाद्या कार्यकर्त्याला आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी भाजपमध्ये संधी वाटत असेल आणि त्यांनी पक्षाचा विचार स्वीकारला असेल, तर त्यांचे स्वागत करणे हे पक्षाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी, पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशाचे त्यांनी कौतुक केले.
बंडखोरीचा विचारही करू नका
राज्मात सुरू असलेल्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना इशारा देताना ते म्हणाले की, पक्षाने एखाद्यावेळी तिकीट कापले तरीही बंडखोरीचा विचार करू नका. कारण पक्ष असेल तरच सरकार आहे. कारण नेत्यांच्या सलगीतूनच कार्यकर्त्यांना खरी ऊर्जा मिळत असते, असे तावडे यांनी सांगितले.