संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस 'कोसळधार'; ५ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Swapnil S

अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तब्बल १२ दिवस आधीच मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे. सोमवारी रायगड आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टीवरील इतर भागांत ऑरेंज अलर्ट जारी आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तीन दिवसांत मुंबईत एंट्री

पुढील तीन दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तमिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत मुंबईतही मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात १०७ टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश