हारून शेख /लासलगाव
कांदा, द्राक्ष, टोमॅटो बरोबरच फुलशेतीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या सोमवारपासून पावसाने थैमान घातले. शनिवारी एकाच दिवशी विक्रमी पाऊस नोंदवला गेला, ज्यामुळे अतिवृष्टीचा फटका सर्वच प्रकारच्या पिकांबरोबर फुलशेतीचेही प्रचंड नुकसान झाले.
दसरा आणि दिवाळी सणामध्ये झेंडू, शेवंती, मोगरा, गुलाब या फुलांची आवक घटण्याची शक्यता फुलशेती उत्पादक आणि फूल विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे ऐन सणांच्या पार्श्वभूमीवर झेंडू भाव खाण्याची (महाग होण्याची) शक्यता आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यात सुमारे ५०० एकरावर झेंडूची रंगबेरंगी फुलशेती फुलवली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे झेंडू आणि गुलाब फुले नष्ट झाली असून, २० टक्के फुले खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे सुमारे ३०० एकरावरील फुलेच हातात येतील, असे उत्पादकांकडून सांगितले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी लाल व पिवळा झेंडूला ६२ रुपये आणि कोलकाता झेंडूला ७३ रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्या तुलनेत यावर्षी लाल झेंडूला १८ रुपये आणि पिवळ्या झेंडूस २५ रुपये इतका अत्यल्प भाव मिळाला आहे. यंदा दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांगल्या फुलांना मागणी व भाव मिळेल या उद्देशाने पिशवी गोणी व कॅरेडच्या पॅकिंग करून झेंडू फुले विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.
झेंडूचे मोठे नुकसान
खरीप हंगामात चांदवड व निफाड तालुक्यातील शेतकरी कांद्यापाठोपाठ चार महिन्यांत उत्पन्न देणाऱ्या आधुनिक झेंडू पिकाकडे वळतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीसाठी पीक बाजारात येईल या पद्धतीने जुलै महिन्यात सिझेंडा, इनव्हा, इंडस, मीरागोड, अँरोगॉड आदी जातीच्या झेंडू फुलांची लागवड केली जाते.
दरात मोठी घसरण
यंदा दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांगल्या फुलांना मागणी व भाव मिळेल या उद्देशाने झेंडू फुले पिशवी, गोणी व कॅरेटच्या पॅकिंगमधून दादर (मुंबई), कल्याण, सुरत, बडोदा, अहमदाबाद, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगरसह तालुक्याच्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आली आहेत. मुंबई, कल्याण, दादर, गुजरात, नाशिक येथील व्यापारी दोन दिवसांपासून चांदवड बाजार समितीत दाखल झाले आहेत.
"यावर्षी ऐन विक्रीला येण्याच्या परिस्थितीत अतिवृष्टीमुळे ७० ते ८० टक्के झेंडूचे नुकसान झाले. फुलांची गुणवत्ता घसरल्याने झेंडूला गतवर्षाच्या तुलनेत कमी दर मिळाले." - सुनील जगताप (फूल व्यापारी)
"फूल व्यवसायाला मागील एक महिन्यापासून महागाईचा फटका बसला आहे. शेवंती आणि झेंडूला सर्वाधिक मागणी असते, परंतु अतिवृष्टीमुळे ही फुले महागतील. मागील नवरात्रोत्सवापेक्षा यंदा मागणी ३० टक्के घटली आहे." - फूल व्यापारी (नाव नाही)