महाराष्ट्र

मराठवाड्यात शेतीची दैना; १२ जणांचा मृत्यू; शेकडो जनावरे वाहून गेली

महाराष्ट्राच्या मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून नांदेड जिल्ह्यात जवळपास २ लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून नांदेड जिल्ह्यात जवळपास २ लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. हिंगोलीत २०० पेक्षा जास्त जणांना स्थलांतरित करण्यात आले असून ९० जणांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या नैसर्गिक आपत्तीत १२ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जनावरेही वाहून गेली आहेत.

नांदेड जिल्ह्यासह अर्धापूर तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर मागील ७२ तासांपासून कायम असल्यामुळे तालुक्यातील सर्वच नदी, नाल्यांना महापूर आला आहे. गावाला शहराशी जोडणारे प्रमुख रस्ते जलमय झाल्याने शेलगाव बुद्रुक, शेलगाव (खुर्द), सांगवी, भोगाव, देळुब (खुर्द) या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता. आजही शेलगाव या गावचा संपर्क तुटलेलाच आहे. पावसामुळे शेतातील कापूस, सोयाबीन, मूग, हळद, ऊस, केळी व पालेभाज्या ही पिके सडून जाण्याची भीती आहे.

रविवारपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आठ जिल्ह्यांना बसला आहे. पावसामुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ४५ महसूल मंडळे प्रभावित झाली आहेत. २ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पावसाच्या पाण्यात वाहून गेली असून २५ जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

नांदेड शहर, हडगाव, अर्धपूर, देगलूर, मडखेड, कंधार, लोहा आणि नायगांव या ठिकाणच्या शेतीला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाऊस थांबल्यानंतरच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात येतील, असे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. सोमवारी भरड, मालेगाव आणि दाभाड या महसुली मंडळामध्ये १२ तासांत १७० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाच्या संततधारेमुळे नांदेडमधील सखल भाग जलमय झाला आहे. वारसणी पंचवटी साईबाबा कामण परिसरात पावसाचे पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पावसाच्या पाण्यात अडकलेल्या दोघांची सुटका करण्यात आली, असेही राऊत म्हणाले.

विष्णुपुरी धरणाचे १४ दरवाजे तसेच अप्पर मणार प्रकल्पाचे १५पैकी ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग गोदावरी आणि मणार नदीत करण्यात आला आहे. नांदेडमधील विविध मोठ्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातील पाण्याची पातळी वेळोवेळी तपासून पाहिली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात, २१८ जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून ८७ जणांची सोमवारी सुटका करण्यात आली. सारंगवाडी गावात १० वर्षीय मुलीसह दोघांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. वासमत येथील टेंभुर्णी येथे एक जण वाहून गेला, त्याचा मृतदेह सोमवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात आला, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले. पुराच्या पाण्यात ७७ गाईचे गोठे वाहून गेले असून सोमवारीही हिंगोलीत तुफान पाऊस सुरू होता, असे जिल्हाधिकारी अभिनव गोएल यांनी सांगितले. हिंगोलीचे पालक मंत्री अब्दुल सत्तार हे पावसाने बाधित गावांना भेटी देत असून त्यांनी मंगळवारी सकाळी सोडेगाव, धोंगरदाव पूल आणि सावरखेडा येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, सावळदबरा परिक्षेत्रात १०१.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणी, पिशोर, चिंचोळी आणि सोयगाव परिक्षेत्रात ६५ मिमी पाऊस पडला.

अशोक चव्हाण मुलीसह शेतकऱ्यांच्या बांधावर

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बुद्रुक) व (खुर्द) या गावाच्या नदीपर्यंत जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. नवी आबादी शेलगाव येथील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यानंतर मेंढला खुर्द-बुद्रुक, खडकी, सांगवी, गणपूर, कोंढा, देळुब खुर्द, भोगाव या गावातील पूरस्थितीची पाहणी करून या पूरस्थितीमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबद्दल माहिती जाणून घेतली. सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्यासोबत भाजप युवा नेत्या श्रीजया अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.

अतिवृष्टी, पुरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी -अमित देशमुख

अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेतपिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शासनाने आपतग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी केली. अमित देशमुख यांनी मंगळवारी नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

अमित देशमुख यांनी मंगळवारी दुपारी आमदार मोहन हंबर्डे तसेच काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह नांदेड शहरातील पाकीजा नगर, बिलाल नगर, लक्ष्मी नगर, गौतम नगर, खडकपुरा भागात जाऊन गोदावरीचे पाणी वस्तीत घुसून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना दिल्या. आपदग्रस्तांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

जायकवाडी धरण ९१ टक्के भरले

जायकवाडी धरण ९१ टक्के भरले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. आवक विचारात घेऊन धरणामधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, पालक मंत्री अब्दुल सत्तार यांनी जायकवाडी धरण येथे सोमवारी जात जलाशयाचे जलपूजन केले. तसेच अतिवृष्टी भागाची पाहणी करत त्यांनी पंचनामे तातडीने करा, असे निर्देश प्रशासनाला दिले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी