मुंबई : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या लढाईनंतर आता नवनिर्वाचित खासदार नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. नारायण राणे यांच्या खासदारकीला विनायक राऊत यांनी आव्हान दिलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी राणे यांना समन्स बजावून याचिकेची सुनावणी १२ सप्टेंबरला निश्चित केली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा ४७८५८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत राणे यांनी प्रचारात मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप करून या गैरप्रकाराची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करा. तसेच राणे यांची निवड अवैध ठरवून मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश द्या अशी विनंती करत विनायक राऊत यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे, विनयकुमार खातू, अॅड. श्रीया आवळे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर सुनावणी झाली.