देवेंद्र फडणवीस यांचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

सामूहिक कॉपीला मदत करणाऱ्या शिक्षकांना बडतर्फ करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द होणार

बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून राज्य सरकारने या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून राज्य सरकारने या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावी परीक्षेत सामूहिक कॉपीचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी परीक्षेच्या तयारीबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते.

इयत्ता बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत राज्याच्या ३,३७३ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३’ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोट‌‌्स, मोबाइल इ.) जवळ बाळगणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

सर्व परीक्षा केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठ्या पथकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केंद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठ्या पथकात नेमणूक करावी. असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर

संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे पूर्णवेळ निगराणी करावी, सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत.

इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

सूर्य कोपतोय! राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

‘नारीशक्ती’ पणाला! ‘आरक्षण’, ‘सीमांकन’ विधेयके संसदेत सादर; आज मतदान, दक्षिणेवर अन्याय नाही- शहा, द्रमुक न्यायालयात जाणार

राजकारणातील महिलांची गुणात्मक वाढ कधी होणार?

चौकशा, कारवाई आणि भीतीची ‘टांगती तलवार’