जालना : मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. माझे शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये. माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये, अशी माझी इच्छा आहे, अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले.
“मला दर ८ ते १५ दिवसांनी सलाईन लावावी लागते. मी तुम्हाला आधीपासूनच सांगतोय. हे शरीर कधी जाईल माहिती नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन, हे मलाही सांगता येत नाही. माझे शरीर कधी धोका देईल, सांगता येत नाही. मी उपोषणे केली आहेत. त्या उपोषणांमुळे मला चालताना, उतरताना-चढतानाही त्रास होतो,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्याने त्यांच्या या विधानामुळे मराठा समाजाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.