महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar Case : आता आईविरुद्धही गुन्हा, शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवणाऱ्या मनोरमा खेडकर फरार?

Swapnil S

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मनोरमा खेडकर यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, या नोटिशीला दहा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे समोर आल्यानंतर त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी सुरू असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. खेडकर यांनी खासगी मोटारीवर लाल दिवा लावल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. तसेच खेडकर यांची आलिशान मोटार पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूजा यांच्या आलिशान गाडीवर थकीत दंड असल्याचेही उघड झाले आहे.

दरम्यान, मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मनोरमा, वडील दिलीप यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खेडकर यांच्या अंगरक्षकांचा (बाऊन्सर) समावेश आहे. खेडकर यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. परवाना देण्यापूर्वीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शस्त्र परवाना का रद्द केला जाऊ नये, अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे. याबाबत येत्या दहा दिवसांत लेखी स्वरूपात उत्तर द्यावे, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित नोटीस खेडकर यांच्या बाणेर येथील नॅशनल सोसायटीतील बंगल्याच्या दारावर चिकटवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोरमा खेडकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. ‘तुमचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे. तुमच्या कृत्यामुळे कुटुंबीय, तसेच समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही शस्त्र परवान्यात दिलेल्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्यात का येऊ नये? अशी नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बजावली आहे.

मनोरमा खेडकर फरार?

दरम्यान, मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या फरार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांचे एक पथक मनोरमा यांचा शोध घेत आहे. मनोरमा यांचा फोनही बंद असल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भीक मांगो आंदोलन

दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्या विरोधात सोमवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी पुणेकरांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. या आंदोलनात पुणेकर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला