महाराष्ट्र

पुण्यात ३०० गुंडांची ओळखपरेड; गुन्हेगारांनो गुन्हे करू नका : पुणे पोलिसांनी समजावले

गुन्हेगारी करायची नाही, रिल्स बनवायचे नाहीत. स्टेटसला गुंडगिरीचे व्हिडीओ ठेवायचे नाहीत, अशी तंबी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

Swapnil S

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. कोयता गँगसकट खंडणीखोरांनी उच्छाद मांडला आहे. शहरात दररोज काही ना काही, कुठे ना कुठे गुन्हा होत आहे. ज्या पुण्याला शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. त्याच पुण्यात तरुणांनी हातात कोयता आणि बंदुक घेऊन नंगानाच चालवला आहे. या सर्व घटनांना चाप बसण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात शहरातील कुख्यात तसेच नामचीन आणि नुकतेच गुन्हेगारीत पदार्पण केलेल्या तरुणांना बोलावण्यात आले होते. गुन्हेगारांनी गुन्हे करू नयेत, अशी समज त्यांना देण्यात आली.

पुणे पोलीस आयुक्तालयात सर्व गुंडांची ओळखपरेड करण्यात आली. आयुक्तालयात तब्बल २०० ते ३०० गुंडांची पोलिसांकडून परेड करण्यात आली आहे. कुख्यात गजा मारणे टोळी, निलेश घायवळ, गणेश मारणे टोळी, बापू नायर टोळी, उमेश चव्हाण टोळी, बंटी पवार टोळी आणि बाबा बोडकेसह अनेक गुंडांची ओळख करण्यात आली. पुण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांचा गुंडांना हा पहिलाच दणका असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पार्थ पवारांनी ज्या गुंडाची भेट घेतली तो म्हणजे गजा मारणेचीही पोलिसांकडून परेड करण्यात आली आहे, तर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळसोबतचा फोटो ट्विट केला, त्याची देखील पोलिसांनी परेड घेतली आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी गुन्हेगारी टोळ्यांना अटकाव करण्यासाठी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांतील प्रमुख आणि साथीदारांना ओळखपरेडसाठी बोलावण्यात आले होते.

गुन्हेगारी करायची नाही, रिल्स बनवायचे नाहीत. स्टेटसला गुंडगिरीचे व्हिडीओ ठेवायचे नाहीत, अशी तंबी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आपले स्वत:चे वर्चस्व दाखवण्यासाठी रिल्स शूट करून त्यांच्या अकाऊंटवर पोस्ट करत असल्यामुळे समाजात विकृती पसरत आहे. त्यासोबतच गुन्हेगारांना कोणताही गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिला.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली