छत्रपती संभाजीनगर : यंदा मान्सून कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे सरकारने पाणी वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एल निनोचा प्रभाव कायम राहिल्यास गतवर्षीच्या तुलनेत सुमारे बारा टक्के कमी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांऐवजी कमी पाण्यावर येणारी, कमी कालावधीतील पिके घेण्याचा सल्ला दिला आहे. पावसाचे आगमन उशिरा होणे, मध्येच मोठे खंड पडणे आणि काही भागांत कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून एल निनोमुळे पावसाचे स्वरूप अनियमित झाले आहे. सुरवातीला जोरदार पाऊस, त्यानंतर दीर्घ कोरडा काळ अशा परिस्थितीमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून उत्पादन घटणे आणि खर्च वाढणे अशा समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या सुमारे ८८ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.
एकूणच यंदाचा खरीप हंगाम हवामानाच्या अनिश्चिततेचा असण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूक्ष्म सिंचन पद्धत वापरा
कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीतील पिकांची निवड, कोरडवाहू पिकांना प्राधान्य, बीजप्रक्रिया करूनच पेरणी, पावसाच्या अंदाजानुसार टप्प्याटप्प्याने पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पाणी साठवण आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावरही भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, हरभरा तसेच काही प्रमाणात सोयाबीन आणि कापूस ही पिके कमी पाण्यातही तग धरू शकतात. त्यामुळे या पिकांना प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले आहे. बीजप्रक्रियेचा वापर केल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उगवण चांगली होते. त्यामुळे उत्पादन टिकवण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.