आयसीएसई दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली असून तब्बल ९९.९८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९९.९७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, आयसीएसई परीक्षेत महाराष्ट्राचा डंका पिटला असून पुण्यातील सेंट मेरिज शाळेची विद्यार्थिनी हरगून कौर माथरू हिने ९९.८० टक्के मिळवून देशात पहिली येण्याचा मान पटकावला आहे. मुंबईच्या जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलची अमोलिका मुखर्जी ही ९९.६० टक्के गुण मिळवून देशात दुसरी आली आहे; मात्र या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ इतकी आहे.
पुण्यातील हरगून कौर माथरू, कानपूरमधील अनिका गुप्ता, लखनऊ येथून कनिष्क मित्तल वरून) बलरामपूरचा पुष्कर त्रिपाठी या चारही विद्यार्थ्यांना ९९.८० टक्के गुण प्राप्त झाले असून चारही विद्यार्थ्यांनी देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे.
देशभरातून एकूण २ लाख ३१ हजार ०६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर २६ हजार ०८३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. ही परीक्षा विविध ६१ विषयांची घेण्यात येते. यामध्ये २० भारतीय तर ९ परदेशी भाषांचा समावेश आहे.देशात तसेच परदेशातील केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १ लाख २५ हजार ६७८ मुले तर १ लाख ५ हजार ३८५ मुली बसल्या होत्या. यापैकी ४३ मुले आणि १६ मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत. परदेशातून यंदा ६०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३ विद्यार्थ्यांना परीक्षेत यश संपादन करता आले नाही. आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे २०२२मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
राज्याचा निकाल १०० टक्के
आयसीएसई परीक्षेला यंदा राज्यातील २४५ शाळांमधून २६ हजार ८३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये १४ हजार १२२ मुले तर ११ हजार ९६१ मुलींचा समावेश होता. राज्याचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. तर राज्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३७ इतकी आहे. राज्यात ९९.६० टक्के गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ११ आहे. तर यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे मुंबईच्या शाळांमधील आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ९९.४० टक्के इतके गुण मिळाले आहेत.