महाराष्ट्र

नवे सरकार स्थापन झाल्यावर बेमुदत उपोषण सुरू करणार - जरांगे

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे जरांगे यांनी मंगळवारी बीड येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Swapnil S

बीड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे जरांगे यांनी मंगळवारी बीड येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.

सरकार स्थापन झाल्यावर उपोषणाची तारीख जाहीर करण्यात येईल आणि त्या तारखेपासून अंतरवाली सराटी येथे आपण बेमुदत उपोषणाला बसणार आहोत, असे ते म्हणाले. आपण आपली आरक्षणाची लढाई आता तीव्र करू, उपोषणाची तारीख जाहीर केल्यानंतर अंतरवाली येथे या, आपण उपोषणाला बसू, सरकार आरक्षण देत नाही तोवर लढाई लढू, असे आवाहन त्यांनी केले.

सरकार स्थापन झाले की मी प्रसारमाध्यमांद्वारे उपोषणाची तारीख सांगेन. त्या तारखेला अंतरवाली सराटीला या. उपोषणाच्या तयारीला लागा. तत्पूर्वी, तुमची शेतीची कामे उरकून घ्या, प्रत्येक कुटुंबातील काही सदस्यांनी उपोषणासाठी या, काही सदस्यांनी घर आणि शेती सांभाळा. दहा ते पंधरा दिवस तुमचे काम बुडेल, मात्र त्याची तयारी ठेवा. आपण उपोषणाला बसू आणि आरक्षण मिळवू, असे ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी मनोज जरांगे-पाटील यांना विचारले की, तुम्ही किती दिवस उपोषणाला बसणार. त्यावर जरांगे म्हणाले, सरकार जोवर आम्हाला आरक्षण देत नाही तोवर उपोषण करत राहणार, मरेपर्यंत उठायचे नाही, असे सर्वांना सांगितले आहे. सरकार आम्हाला आरक्षण कसे देत नाही ते पाहावयाचे आहे, असे ते म्हणाले.

गुलालात नाचू नका!

मराठा समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, निवडणुकीचे, राजकारणाचे खुळ आता डोक्यातून काढून टाका. वेडेपणा करू नका. तुमचा नेता मंत्री झाला असेल, आमदार झाला असेल तर त्याच्या गुलालात नाचू नका. तो तुम्हाला नाचवेल. परंतु, तुमच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकरांच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकराला शाळा, महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तर तिथे तो मदत करणार नाही. त्याला नोकरी लावून देणार नाही. आगामी काळात वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या भरत्या निघणार आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी तुटून पडा, असे आवाहन त्यांनी केले.

सामूहिक उपोषण

तुम्ही वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान केले असेल, तुम्ही ज्यांना मतदान केले ते उमेदवार निवडूनही आले असतील. त्या आमदारांशी आरक्षणासाठी भांडा, तो आमदार भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल, महाविकास आघाडी किंवा महायुतीचा असेल, मराठ्यांनी आता एकजूट करून त्या आमदारांना आरक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन करावे. आपल्याला आरक्षण मिळवावेच लागेल. त्यासाठी सर्व मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक बेमुदत उपोषणाला बसायचे आहे, असेही ते म्हणाले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन