सिंधुदुर्ग : देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नुकतेच झाले. सुमारे २३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हा प्रकल्प कोकण आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा असून, स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीला चालना देईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आल्याने शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही जिल्हा बँक आणि अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज व आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ लागू करण्यात आली आहे.
देशातील मत्स्य उत्पादनात आंध्र प्रदेश आघाडीवर असून, त्या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छिमारांनाही जागतिक स्पर्धेत उतरविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे राणे यांनी सांगितले. मत्स्य उत्पादनाबरोबरच माशांपासून आणि कोळंबीपासून निघणाऱ्या टाकाऊ पदार्थांचे मूल्यवर्धन करण्यावरही भर दिला जाणार आहे.
या कचऱ्यापासून सौंदर्यप्रसाधन उद्योगात वापरले जाणारे ‘कोलाजेन’ तयार करण्याच्या उद्योगांना संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ लागू करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, सरपंच नीलेश चमणकर, सिंधुदुर्ग
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पाचे काम दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
एक कोटी मत्स्यबीज तयार करण्याचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागू नये, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प पुढील वर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या केंद्रामुळे मत्स्यव्यवसाय, महिला बचत गट आणि तरुणांना लाभ होईल. जिताडा प्रकारातील एक कोटी मत्स्यबीज तयार करण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पातून साध्य केले जाणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यबीज संवर्धन करून मत्स्य उत्पादक आणि बचत गटांची साखळी विकसित केली जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.