शरद पवार गट NDA सोबत? जयंत पाटील-विनोद तावडे भेटीने नवी चर्चा (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

शरद पवार गट NDA सोबत? जयंत पाटील-विनोद तावडे भेटीने नवी चर्चा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यातील बैठकीनंतर शरद पवारांचा गट केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

Swapnil S

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यातील बैठकीनंतर शरद पवारांचा गट  केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत  (एनडीए)  सहभागी होणार असल्याची  जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र, ही प्रक्रिया नेमकी कधी होईल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. बहुचर्चित संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार अथवा फेरबदलावेळी शरद पवार गट भाजप जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना उबाठा आणि  तृणमूल काँग्रेसच्या खासदारांमध्ये फूट पडल्यानंतर भाजपने आपले पुढील लक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटावर केंद्रित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या खासदार, आमदारांपैकी अनेक जण भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही आहेत. शरद पवार गटाचे लोकसभेत ८ तर विधानसभेत १० आमदार आहेत.  या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील किंवा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग बनवतील, अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत आल्यास केंद्र आणि राज्यातील सत्तेत पक्षाला नेमका काय वाटा मिळू शकतो, याबाबत पाटील आणि तावडे यांच्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये  चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, चर्चेबाबत  दोन्ही पक्षाकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. शरद पवार गटाला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद हवे आहे. तर राज्याच्या सत्तेतही पक्षाला महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद आणि राज्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे. मात्र, सत्तापदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपले पत्ते खुले ना करण्याची भूमिका शरद पवार गटाने घेतली आहे.

दरम्यान, या भेटीबाबत जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी तावडे यांच्याशी भेट झाल्याचे मान्य केले. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भेटीत अनौपचारिक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अशा भेटी होत असतात असे सांगत पक्षाच्या राजकीय निर्णयाविषयी भाष्य करण्यास नकार दिला. गेल्या महिन्यात  तावडे यांना आपण २१ वेळा भेटल्याचेही त्या म्हणाल्या.  दरम्यान, शरद पवार गटाचे  आमदार रोहित पवार यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भाजपसोबत जाण्याची चर्चा फेटाळून लावली .

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एसटीची 'ग्रुप ऑफर' हिट! गणेशोत्सवासाठी ३० टक्के अधिभार रद्द केल्याने कोकणासाठी ५,१८४ बसेस फुल्ल

समृद्धी महामार्ग होणार 'स्मार्ट'! AI कॅमेऱ्यांच्या उभारणीला सुरुवात; नागपूरपासून २५० किमीच्या टप्प्यांत काम

Mumbai : चर्चेविना २० हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर; विरोधकांचा सभागृहातून सभात्याग; महापालिका सभागृहाबाहेर प्रतिसभागृह

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर शौचालयांचा अभाव; नगरसेवकांचा सभागृहात प्रशासनावर हल्लाबोल

Mumbai : कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात; कार-टॅक्सीची जोरदार धडक