महाराष्ट्र

राज्यात हुडहुडी वाढणार! पारा २ ते ३ अंशांनी आणखी खाली येणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढला असून नागरिकांना हुडहुडी भरू लागली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे. रात्रीच्या सुमारास जास्त थंडी पडत असल्याने अनेक जिल्हे गारठल्याचे चित्र आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढला असून नागरिकांना हुडहुडी भरू लागली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे. रात्रीच्या सुमारास जास्त थंडी पडत असल्याने अनेक जिल्हे गारठल्याचे चित्र आहे. कमाल तापमानात १ ते २ अंशांनी घट झाली असून येत्या काही दिवसांत तसेच डिसेंबर महिन्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये थंडी आणखी वाढणार असून किमान तापमानामध्ये दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. नाशिकमधील किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. नाशिकमध्ये सकाळच्या वेळी धुके पडत असून त्यानंतर आकाश निरभ्र असणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ढगाळ आकाशासह धुके पाहायला मिळणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे असेल.

पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे, तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुके असणार आहे. त्यानंतर मात्र आकाश निरभ्र होईल. मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस एवढे राहील. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून कमाल आणि किमान तापमानात दोन अंशांनी घट झाली आहे. तेथील किमान तापमान १२ अंशांपर्यंत खाली येणार आहे.

मुंबईतही १६.८ अंश सेल्सिअसची नोंद

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून मुंबईतही मंगळवारी सकाळी १६.८ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील सांताक्रुझ वेधशाळेने कमाल ३३.१ आणि किमान १६.८ तापमानाची नोंद केली. “पुढील काही दिवसांत मुंबईकरांना बोचऱ्या थंडीचा आनंद घेता येईल. सकाळच्या वेळी थंडीचा जोर वाढणार असून दृश्यमानताही कमी राहील. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रासहित मुंबईवरही त्याचा परिणाम होणार आहे,” असे हवामान विभागाचे मुंबई प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले.

मुंबईत आजारांतही वाढ

तापमानाचा पारा खाली आल्याने मुंबईत आजारांमध्येही वाढ झाली असून बहुतेक सर्व हॉस्पिटल्स, क्लीनिकमध्ये तुडुंब गर्दी दिसत आहे. सर्व वयोगटांमध्ये कफ, खोकला, सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अस्थमा, ब्राँकायटिस आणि श्वसनासंदर्भात इतर समस्या जाणवू लागल्या आहेत. हिवाळ्याला सुरुवात झाल्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सर्व विख्यात डॉक्टरांनी केले आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत