व्हायरल व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट 
महाराष्ट्र

Jalgaon : बाळंत महिलेला नेणाऱ्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा अचानक स्फोट; चालकाच्या समयसुचकतेमुळे बचावले प्राण

वाहन चालकाच्या समयसुचकतेमुळे रुग्णवाहिकेतील प्रसूत महिला, तिचे बाळ व डॉक्टर बचावले.

Swapnil S

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खोटे नगरजवळ बुधवारी रात्री १० वाजता रूग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन १०८ या रुग्णवाहिकेला आग लागली. वाहन चालकाच्या समयसुचकतेने रुग्णवाहिकेतील प्रसूत महिला तिचे बाळ व डॉक्टर यांना बाहेर काढल्याने ते बचावले असून कोणालाही इजा अथवा दुखापत झालेली नाही. या प्रकरणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ याची माहिती घेऊन पोलीस विभागाला घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल येथून एमएच १४ सीएल ०७९६ ही १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रात्री मनीषा रवींद्र सोनवणे या प्रसूत महिलेला तिचा बाळासह येथील शासकीय रुग्णालयात घेऊन येत होती महामार्गावर खोटे नगरजवळ वाहनचालक राहूल बाविस्कर याला गिअर बदलतांना आगीची ठिणगी उडाल्याचे जाणवले. त्याने तत्काळ रुग्णवाहिकेमधील महिला बाळ व सोबत असलेले डॉक्टर यांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणात रुग्णवाहिकेमधील सिलिंडरचा स्फोट झाला व लागलेल्या आगीत रुग्णवाहिका जळून खाक झाली.

या घटनेच्या तपासात परिवहन विभाग पोलीस विभागाला मदत करणार आहे आणि त्याच्याशिवाय १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापनालाही बोलवून घेण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या रुग्णवाहिकेऐवजी इतर जिल्ह्यातून दुसरी रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे. ज्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकेचे प्रमाण पुरेसे राहील आणि जळगाव जिल्ह्यात रुग्णवाहिकेची कमतरता भासणार नाही.

‘एक है, तो सेफ है’ हे वोट जिहादला प्रत्युत्तर; देवेंद्र फडणवीस यांनी केले योगी, मोदींच्या घोषणांचे समर्थन

महायुतीनेच घेतला ‘बटेंगे’चा धसका; पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली नापसंती

१८ ते २० नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षण सचिवांकडून सर्व शाळांना विनंतीपत्र

वरळी मतदारसंघात तिरंगी लढत; आदित्य ठाकरेंसमोर शिंदे सेना आणि मनसेचे आव्हान

मतदानाच्या दिवशी मेट्रो, बस उशिरापर्यंत धावणार! BMC आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश