जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वाकोद गावाजवळ सोमवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळले. धडक एवढी जोरदार होती की काही क्षणांतच कारने पेट घेतला. या भीषण आगीत कारमधील एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला.
चालक वाचला पण महिला जळाली
जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर कारमधून अचानक धूर बाहेर येऊ लागला आणि अगदी काही सेकंदांतच कारने पेट घेतला. कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. वाहनातील चालकाला बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. परंतु, मागील बाजूस बसलेली महिला कारमध्येच अडकली. आग इतकी प्रचंड होती की दरवाजा किंवा काच फोडण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. मदतकार्य सुरु असतानाच आगीने उग्र रूप धारण केले आणि अखेर त्या महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. कार काही मिनिटांत पूर्णपणे जळून खाक झाली.
वाहन पूर्णत: नष्ट
अपघातानंतर काही नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विशाल जोशी आणि इतर ग्रामस्थांनी सुरुवातीचे प्रयत्न केले. त्यानंतर जामनेर पोलिसांनाही तातडीने माहिती देण्यात आली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग नियंत्रणाबाहेर गेल्याने वाहन पूर्णत: नष्ट झाले.
मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू असून जखमी चालकावर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
या अपघातामुळे जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला. घटनेची माहिती पसरताच परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून या भीषण दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.