जळगाव जिल्हा बँक निवडणूक: गिरीश महाजनांसह महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध; उर्वरित नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात X
महाराष्ट्र

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: गिरीश महाजनांसह महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध; उर्वरित नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात

राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १२ जागांवर एकच उमेदवार राहिल्याने महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत...

Swapnil S

जळगाव : राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १२ जागांवर एकच उमेदवार राहिल्याने महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे चार, शिवसेना (शिंदे गट)चे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे दोन उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित नऊ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल ४०२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९२ अर्ज अवैध ठरले. माघारीच्या अंतिम दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. बारा मतदारसंघांत एकच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी ही माहिती दिली.

घराणेशाहीला ऊत

बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये जळगाव ग्रामीण विकास सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरमधून माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, पारोळा मतदारसंघातून माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी चिमणराव पाटील, एरंडोलमधून आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल अमोल पाटील यांचा समावेश आहे. पाचोरा मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित किशोर पाटील, बोदवडमधून मधुकर रामचंद्र राणे, धरणगावमधून जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल संजय पवार, चोपड्यातून रोहित दिलीप निकम, भडगावमधून सोनसिंग कुमानसिंग पाटील, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे हे बिनविरोध विजयी झाले आहेत.

३० नोव्हेंबरला मतमोजणी

उर्वरित नऊ मतदारसंघांमध्ये यावल, रावेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, दोन महिला मतदारसंघ, सोसायटी आणि इतर संस्था मतदारसंघांचा समावेश आहे. या जागांसाठी २९ उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप होणार असून, २९ नोव्हेंबरला मतदान आणि ३० नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी सांगितले.

या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीकडे उमेदवारांची संख्या कमी असल्याचे चित्र असून, नऊ जागांसाठी पॅनेल उभे करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे, महायुती सर्व २१ जागांवर विजय मिळवेल.
गिरीश महाजन, मंत्री

Mumbai: २० ‌विभागांचा निधी दिवाबत्तीसाठी; रस्त्यांवरील दिवाबत्तीची ५४.८० कोटींची थकबाकी, चालू आर्थिक वर्षातील तरतूदही अपुरी

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कामकाज ठप्प; संपात राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी

भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

Thane : 'बाळासाहेब असते, तर त्याच रात्री न्याय मिळाला असता'; कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती